म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणुकीतील नाशिक, धुळेसह अनेक मतदार संघांतील उमेदवारांची अद्याप निश्चिती झालेली नसली तरी, यंदा महिला उमेदवारांना मिळालेली सर्वपक्षीय पसंती हा चर्चेचा अन् कौतुकाचा विषय बनला आहे. पैकी जळगाव व उस्मानाबाद मतदार संघातील महिला उमेदवारांचे नाशिक कनेक्शन पुढे आले आहे.भारतीय जनता पक्षाने जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी बहाल केल्याने खळबळ उडाली. परिणामी उन्मेष पाटील यांनी भाजपचा राजीनामा देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र, गेल्या निवडणुकीत स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झालेली असताना व अर्ज भरायला जात असताना त्यांच्याऐवजी उन्मेष पाटील यांना एबी फॉर्म दिला गेला होता. तेव्हाही केवळ भाजपमध्येच नव्हे, तर राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. महिलेचा असा अनादर केल्याबद्दल भाजपवर विरोधकांनी टीकास्रही सोडले होते. अर्थात् नंतर वाघ यांना विधान परिषदेवर घेऊन भरपाई केली होती. आता मात्र गेल्यावेळची चूक सुधारून भाजपने पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना संधी दिली. स्मिता वाघ यांचे सासर अंमळनेर तालुक्यातील वणी डांगर हे आहे, तर माहेर नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसूल आहे. स्मिताताईंचे वडील रावसाहेब जहागीरदार हे देखील सक्रिय राजकारणात होते. येवला पंचायत समितीचे सभापतिपद त्यांनी भूषविले आहे. दस्तुरखुद्द स्मिताताई यादेखील जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या. त्यांचे पती उदय वाघ हे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते.उस्मानाबाद मतदार संघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातर्फे अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली अन् अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण अर्चना या भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह यांच्या सौभाग्यवती आहेत. महायुतीमध्ये हे दोन्ही पक्ष असले तरी दोन स्वतंत्र पक्षात पती-पत्नी विभागले गेल्याचे अनेकांना विशेष वाटत आहे. अर्चना पाटील या देखील नाशिकशी संबंधित आहेत. त्यांचे मातुल आजोबा नामदेवराव सोनवणे हे कृषी अधिकारी होते. नाशिकच्या कॉलेजरोडवरील कृषिनगर वसाहतीच्या संस्थापकांपैकी ते एक होते. त्यांच्या पत्नी व भाजपचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री उत्तमराव पाटील यांच्या पत्नी या दोघी बहिणी होत्या. अर्चना पाटील यांचे वडील वामनराव पाटील (अहिरे) हे बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील असल्याचे सांगितले जाते. ते पुण्यात टेल्को कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. त्यामुळे अर्चना यांचे शिक्षण पुण्यातच झाले. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव व विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह व अर्चना हे पुण्यात अभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाच त्यांचा संबंध जुळला. बारामतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या अर्चना या भाचेसून आहेत. अर्चना यांचे आजोळ नाशिक असल्याने त्यांचा तसेच स्मिताताई वाघ यांचाही नाशिकशी असा आगळावेगळा ऋणानुबंध राहिलेला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kegj5OE
No comments:
Post a Comment