(महेश गुंडेटीवार): अहेरी उपविभागात रेतीघाट नसल्याने सध्या मोठ्या जोमात सुरू आहे. याच उप विभागातील भामरागड तालुका मुख्यालयातील पर्लकोटा नदीपात्रात चक्क रस्ता तयार करून राजरोसपणे नदी पोखरले जात होते. या नदीतून मोठ्या प्रमाणात रेती उपसा करून नदी काठावरील जंगलात साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळताच अहेरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आदित्य जिवने यांनी धाड टाकली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेले वाळूचे ढिगारे पाहून त्यांचेही डोळे चक्रावून गेले. दरम्यान त्यांनी योग्य चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देताच भामरागड मध्ये एकच खळबळ उडाली आहे.भामरागड तालुका मुख्यालयात इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा या तीन नद्यांचा संगम आहे. येथील बारमाही वाहणाऱ्या नदीमध्ये उत्तम दर्जाची रेती आहे. या रेतीवर मागील काही वर्षांपासून तस्करांची नजर पडली आहे. काही तस्करांनी नदीपात्र पोखरून काढण्यासाठी चक्क मुरूमचा रस्ता बनविला असून पर्लकोटा नदीतून शोकडो ब्रॉस रेती तस्करी केली जात आहे. मागील चार-पाच महिन्यापासून सुरू असलेला हा गोरखधंदा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आदित्य जिवने यांच्या लक्षात येताच त्यांनी आज ३१ मे रोजी चक्क भामरागडच्या जंगलात घुसून त्यांनी ही कारवाई केली. त्यामुळे स्थानिक महसूल आणि वन विभागाच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्यात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकाम केली जात आहे. मात्र, या ठिकाणी रेती घाटच नाही तर रेती येते तरी कुठून ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. स्वतः सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आदित्य जिवने यांनी प्रत्यक्ष धाड टाकून हा सगळा प्रकार उघडकीस आणल्याने रेती तस्करामध्ये धडकी भरली आहे. विशेष म्हणजे भामरागड शहरात प्रवेश करतानाच उजव्या बाजूच्या जंगलात पर्लकोटा नदी काठावर मोठ्या प्रमाणात उत्तम दर्जाची रेती साठवून ठेवली होती. पावसाळ्यात येथील नद्या तुडुंब भरून वाहत असल्याने या ठिकाणी रेती उपसा करणे शक्य होत नाही. त्यामुळे आतापासूनच रेती साठवून ठेवण्याचे काम तस्करांनी केल्याचे बोलले जात आहे. मात्र,एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेले रेतीचे ढिगारे महसूल आणि वनविभागाच्या नजरेस कसे आले नाही ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
त्या चौकशीचे काय झाले ?
अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे हे ३० डिसेंबर रोजी २०२३ रोजी भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी अचानक स्थानिक महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन याच नदी पत्रात अवैधरित्या सुरू असलेल्या उत्खननावर कारवाई केली होती. त्यावेळी सुद्धा रेती तस्करीसाठी तयार केलेला रस्ता जेसीबी बोलावून तोडायला लावला होता. एवढेच नव्हे तर किती ब्रास रेती उत्खनन करण्यात आली आणि हे रेती तस्कर कोण याची योग्य चौकशी करण्याची निर्देश संबंधित तहसीलदारांना दिले होते. या चौकशीचे नेमके काय झाले याचा पत्ताच नाही.मात्र आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/U92bOue
No comments:
Post a Comment