पंकज गाडेकर, वाशिम: देशभरात बकरी ईदचा उत्साह आनंदाने साजरा होत असताना वाशिम जिल्ह्यात पोहायला गेलेल्या काही युवकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार होत नाही तोच दुसऱ्या ठिकाणी पोहायला गेलेल्या अजून तीन मित्रांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने आजचा दिवस वाशिम जिल्ह्यासाठी काळरात्र ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दोन घटनेत एकूण चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुरुवातीला मंगरूळपीर तालुक्याती दस्तापूर इथे तीन ते चार मित्र सोबत पोहण्यासाठी धरणावर गेले होते. त्यात एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. मोहम्मद हुजेफ मोहम्मद रियाजुद्दिन याचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. त्याचावर अंत्यसंस्कार होत नाही तोच कारंजा तालुक्यातील तीन मित्र अडान धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्या तीनही मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेनं जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. रेहान खान हाफिज खान (१९), साईम करीम बेग (१७), इस्पान अली अर्षद अली (१६) असे कारंजा येथील अडान धरणात मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. हे तिघे धरणात पोहायला गेले असताना तिघांचा करूण अंत झाला. घटनेची माहिती मिळताच सास मदत केंद्राचे अजय ढोक यांनी घटनास्थळी धाव घेऊन सहकाऱ्यांच्या माध्यमातून मृतदेह बाहेर काढले. आज ईदच्या दिवशी जिल्ह्यात दोन ठिकाणी पोहायला गेलेल्या चार युवकांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8FrmUdq
No comments:
Post a Comment