अर्जुन राठोड, नांदेड : रानभाजीतील एक महत्वाची भाजी म्हणजे कर्टुले. ही भाजी साधारणपणे माळरानावर उगवते. या भाजीला बाजारातही मोठी मागणी असते. भाजीला असलेल्या मोठी मागणीमुळे भोकर तालुक्यातील हाळदा येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात कर्टूले लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कर्टुल्याच्या शेतीतून शेतकरी चार महिन्यात जवळपास ७ लाख रुपयांचं उत्पन्न मिळवत आहे. आनंदा बोईनवाड असं कर्टुले या रानभाजीची यशस्वी शेती करणाऱ्या या शेतकऱ्याचं नाव आहे.
कर्टुले या रानभाजीतून यशस्वी शेती
भोकर तालुक्यातील हाळदा येथील शेतकरी आनंदा बोईनवाड यांची १९ एकर शेती आहे. दरवर्षी ते शेतात विविध पीकं घेत असतात. मात्र म्हणावं तस उत्पन्न मिळत नव्हतं. तेव्हा त्यांनी कर्टूले या रानभाजीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. २०२० मध्ये बोईनवाड यांनी आपल्या तीन एकर शेतात कर्टुल्याच्या सहा किलो बियाणांची लागवड केली. विशेष म्हणजे पावसाळ्यात कर्टुल्याची शेती होते.आनंदा बोईनवाड यांना पहिल्या वर्षी पाच लाखाच्या आसपास उत्पन्न मिळाले. त्यानंतर मागील चार वर्षात उत्पन्नात वाढच होत गेली. भाजीसह बियाणे उत्पादनातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. थंडी पडताच ही वेलवर्गीय झाडे लुप्त होतात आणि पावसाळ्याचे रोहिण्या आणि मृग नक्षत्र लागताच आपोआप उगवतात आणि उत्पादनाला सुरुवात होते. तीन एकरात २० ते २५ क्विंटल भाजीचे उत्पादन काढून दहा ते तेरा हजार प्रतिक्विंटल नुसार अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळते. तर वर्षाकाठी एक क्विंटल बियाणांतून पाच हजार प्रति किलो, असे पाच लाख असे जवळपास चार महिन्यात सात लाखाचं उत्पन्न मिळत असल्याचे बोईनवाड यांनी सांगितले.कर्टुल्याला इतर राज्यात मागणी
कर्टुल्याच्या या रानभाजीला तेलंगणा, हैदराबाद, विदर्भातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेष म्हणजे माळरानावर कर्टुल्याच्या वेली पाहायला मिळतात. आता हा प्रयोग शेतकरी आपल्या शेतात करताना पाहायला मिळत आहेत. १० ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने कर्टुल्याची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ही भाजी तोडणीला येते. आरोग्यदायक, अनेक रोगांवर रामबाण उपाय असल्याने बाजारात या रानभाजीला मोठी मागणी आहे.बियाणांमधून लाखोंचे उत्पन्न
१५ मे ते १ जून दरम्यान बियाणांची लागवड करावी लागते. पंधरा दिवसानंतर वेली उगवून, त्यानंतर साधारण दीड महिन्यात फळ लागवडीला सुरुवात होते. सुरुवातीला भाजी म्हणून विक्री केली जाते. त्यानंतर बियाणे विकत असल्याचं आनंदा यांनी सांगितलं. सुरूवातीच्या वर्षी बियाणांचा भाव माहिती नसल्यामुळे कमी दरात विकले. आता मात्र पाच हजार प्रति किलोच्या पुढेच बियाणांचा भाव मिळत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि तेलंगणातील अनेक शेतकरी बियाणे घेऊन जात आहेत. अत्यंत कमी खर्च असणारे आणि चांगले उत्पादन देणारे पीक असल्यामुळे मोठी मागणी आहे, असंही शेतकरी आनंदा बोईनवाड म्हणाले.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/q1JxkrX
No comments:
Post a Comment