म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दोन हप्ते मिळण्यास सुरुवात झाली असतानाच, या योजनेच्या प्रसिद्धीसाठीही राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेच्या प्रसिद्धिसाठी १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार ४३६ रुपयांच्या निधीला महिला व बालविकास विभागाने मान्यता दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मंजूर माध्यम आराखड्यानुसार, फोन कॉल, सिनेमागृहे, एसटी स्टँड, मेट्रो, रेल्वे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी या योजनेची प्रसिद्धी केली जाणार आहे.आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. मागील काही दिवसांपासून या योजनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असतानाच, गुरुवारी या योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यावर दोन हप्ते जमा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मागील काही दिवसांपूर्वी ही योजना राज्यात सर्वत्र पोहोचवण्यासाठी महायुती सरकारने सर्वस्व पणाला लावले आहे. त्याअंतर्गत आता या योजनेच्या प्रसिद्धीसाठी माध्यम आराखडा राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे हा माध्यम आराखडा राबवण्यात येणार आहे. त्यानुसार, १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार ४३६ रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्धीची कार्यवाही माध्यम आराखडा समितीतर्फे करण्यात येणार आहे. या योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी मीडिया प्लॅनिंग करणे, दृक्श्राव्य, श्राव्य जाहिरातीचे क्रिएटिव्ह तयार करणे त्याचप्रमाणे बाह्य माध्यमांच्या प्रसिद्धीचा मजकूर अंतिम करण्याची कारवाई करण्याची सूचना समितीतर्फे करण्यात आली आहे.-‘लाडकी बहीण’च्या माध्यम आराखड्यास मंजुरी- महिला व बाल विकास विभागाचा निर्णय- सिनेमागृहे, रेल्वे स्थानके, मेट्रोतही होणार प्रसिद्धी- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचा निर्णय
माहितीपट, जिंगल्स, थीम साँग तयार करणार
ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रिंट, टीव्ही या माध्यमांप्रमाणेच अॅनिमेशन फिल्म, थीम साँग, जिंगल्सची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यानुसार माध्यम आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याशिवाय १६ एफएम वाहिन्यांवरही प्रसिद्धी केली जाणार आहे.ट्रेन, सिनेमागृहातही प्रसिद्धी
ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिनेमागृहांत याची प्रसिद्धी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय मुंबईतील सेंट्रल आणि हार्बर रेल्वेवर ऑडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी केली जाणार आहे. राज्यातील एसटी स्टँड, बस स्टँड, खासगी होर्डिंग, मुंबई विमानतळ, मेट्रो, रेल्वेमधून यासाठी प्रसिद्धी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/HfLoSI5
No comments:
Post a Comment