नवी दिल्ली: जेट एअरवेजच्या दिवाळखोरीचे प्रकरण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढले. आर्थिक संकटामुळे सध्या बंद पडलेल्या या विमान कंपनीच्या पुनरुज्जीवनाचे सर्व प्रयत्न फसल्याची दखल घेत ही कंपनी आता अवसायनात काढा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्याचबरोबर ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी जालान कालरॉक कन्सोर्शियमने भरलेले २०० कोटी रुपये जप्त करण्याचा आणि भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील जेट एअरवेजच्या धनको वित्तसंस्थांना विमान कंपनीने दिलेली १५० कोटी रुपयांची बँक हमी वरील रकमेतून काढून घेण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.सर्वोच्च न्यायालयाचे , न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या पीठाने राज्यघटनेच्या कलम १४२ अंतर्गत असलेल्या विशेषाधिकाराचा उपयोग करत जेट एअरवेजच्या दिवाळखोरी प्रक्रियेला पूर्णविराम दिला. याद्वारे या पीठाने राष्ट्रीय कंपनी विधी अपीलीय लवादाने (एनसीएलएटी) दिलेला आदेश बाजूला ठेवला. जेट एअरवेजचे हे सर्व प्रकरण म्हणजे विमान कंपनीच्या दिवाळखोरीचा उत्तम नमुना असल्याचे सांगत बँक हमीसमोर आर्थिक दिवाळखोरी कमी करण्याचा एनलीएलएटीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुंडाळला. अशा प्रकारे बँक हमीसमोर आर्थिक दिवाळखोरी कमी करून ही कंपनी ताब्यात घेण्याचा जालान कालरॉक कन्सॉर्शियमला (जेकेसी) दिलेला आदेश रद्दबातल ठरवला. जेकेसीला जेट एअरवेज ताब्यात घेण्यासाठी एनसीएलएटीने पहिला हप्ता म्हणून ३५० कोटी रुपये भरण्यास सांगितले व यातून १५० कोटींची बँकहमी वळती करून घेण्यास सांगितले होते. परंतु हा आदेश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान असल्याचे या पीठाने सांगितले. दिवाळखोरीतून बाहेर येण्यासाठीची प्रक्रिया सुरू होऊन आज पाच वर्षे उलटली असून यामध्ये कोणतीही प्रगती झालेली दिसत नाही. ही सर्व प्रक्रिया वास्तविक लवादाकडून मंजूर करून घेतली गेली आहे. त्यामुळेच राज्यघटनेच्या कलम १४२चा आधार घेऊन काढण्याचा आदेश देण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय उरला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या या पीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर आलेल्या कोणत्याही थकीत प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी राज्यघटनेच्या १४२ कलमाच्या आधारे पूर्वीच्या वैधानिक व्यवस्थांनी दिलेलेल सर्व निर्णय रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार मिळतो.जेट एअरवेजमधील घडामोडी- एप्रिल २०१९पासून विमान कंपनीचे कामकाज बंद आहे.- जेकेसी या नव्या प्रस्तावित प्रवर्तकाने ही विमान कंपनी ताब्यात घेण्याचे ठरवले असून, या कन्सोर्शियमने अतिरिक्त १०० कोटी देण्याचेही मान्य केल्याचे जेट एअरवेजने सप्टेंबर २०२३मध्ये जाहीर केले.- चालू वर्षापासून पुन्हा उड्डाणे सुरू करण्याचे ठरवत असल्याचेही जेट एअरवेजने जाहीर केले होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines | Maharashtra Times https://ift.tt/4rtQl2G
No comments:
Post a Comment