वृत्तसंस्था, चेन्नई : मंदिरातील देवाच्या हुंडीत पैसे अर्पण करताना काळजी न घेणे, एका भाविकाला चांगलेच महागात पडले आहे. खिशातून पैसे काढताना देवासमोरील हुंडीत चुकून पडलेला आयफोन या भक्ताने विनवणी करूनही त्याला मिळू शकलेला नाही. ‘हुंडीत पडलेली कोणतीही वस्तू ही आता मंदिराची मालमत्ता आहे,’ असे सांगून तमिळनाडू हिंदू धार्मिक आणि धर्मादाय निधी विभागाने ही भाविकाची विनंती ‘विनम्रपणे’ फेटाळून लावली आहे.दिनेश नावाच्या या भाविकासोबत हा विचित्र प्रकार घडला. ही घटना घडताच त्याने तातडीने थिरूरपोरूर येथील श्री कांदास्वामी मंदिराच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि घडला प्रकार कथन केला. शुक्रवारी, ही हुंडी उघडण्यात आली आणि मंदिर व्यवस्थापनाने त्याला संपर्क करून आयफोन हुंडीत सापडल्याचेही सांगितले. मात्र त्याचबरोबर त्याला या फोनमधील डेटा मिळेल, पण आयफोन काही मिळणार नाही, असेही स्पष्ट केले. दिनेशने मात्र यासाठी तयार झाला नाही. त्याला त्याचा फोनच परत हवा होता. शनिवारी जेव्हा हे प्रकरण हिंदू धार्मिक आणि धर्मादाय निधी विभागाचे मंत्री पी. के. सेकार यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांनीही याबाबत काहीही करण्यास असमर्थता दर्शवली. ‘हुंडीत टाकलेली कोणतीही वस्तू, मग ती चुकून तरी टाकलेली का असेना, ती देवाच्या खात्यावर जाते,’ असे ते म्हणाले. ‘मंदिरातील प्रथा आणि परंपरांनुसार हुंडीत अर्पण केलेली कोणतीही वस्तू थेट त्या मंदिरातील देवाची असते. प्रशासनाला अर्पण केलेल्या वस्तू परत करण्याची परवानगी कोणताही नियम देत नाही,’ असे मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र ‘भक्ताला त्या बदल्यात काही भरपाई देता येईल का, याचा निर्णय अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून घेतला जाईल,’ असेही ते म्हणाले. १९७५च्या हुंडी नियमानुसार, हुंडीमध्ये अर्पण केलेली कोणतीही वस्तू मंदिराच्या मालकीची असते. त्यामुळे ती मालकाला परत केली जात नाही,’ असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
याआधी सोन्याची साखळी चुकून अर्पण
अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच घटना नाही. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या अलाप्पुझा येथील एस. संगीता यांच्याकडूनही मे २०२३मध्ये त्यांची १.७५ तोळ्याची सोन्याची साखळी पलानीतील प्रसिद्ध श्री धंडायुथपनी स्वामी मंदिरातील हुंडीत चुकून पडली होती. संगीता त्यांच्या गळ्यातील तुळशीचा हार अर्पण करत असताना त्यांच्या गळ्यातील सोनसाखळीही हुंडीत पडली होती. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती आणि अपघाताने ही साखळी हुंडीत पडल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाल्यानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या संचालकांनी तेवढ्याच किमतीची सोनसाखळी वैयक्तिक खर्चाने विकत घेऊन तिला दिली होती.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Maharashtra Vidhan Sabha Elections Result News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ez5H1Bs
No comments:
Post a Comment