नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरा औरंगजेबाचादेखील इतिहास वाचावा. औरंगजेबाने शंभू महाराजांना ज्या पद्धतीने मारलं ही क्रूरता होती. औरंगजेबाने त्याच्या भावालाही मारलं. दारा शिकोहला ज्या पद्धतीने मारलं तसंच शंभू महाराजांना मारलं. पण शंभू महाराजांना मारण्याबाबत आदेश दिल्यानंतर त्यांना कसं मारावं हे मनुस्मृतीप्रमाणे पंडित लोकांनी सांगितलं आणि तशा पद्धतीने त्यांना मारलं गेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मान्य करतील का?", असं धक्कादायक वक्तव्य हुसैन दलवाई यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. "वस्तुस्थिती अमान्य करुन चालणार नाही. शिवाजी महाराजांचा अपमान सावरकरांनीदेखील केला आहे. कोरटकराने देखील केला आहे. त्याला अटक करायला इतके दिवस लागले. शिवाजी महाराज हे आमचे राजे, ज्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन राष्ट्र निर्माण करण्याचं काम केलं, त्यांच्याबद्दल अनादर कोण निर्माण करतं? महाराष्ट्रातील मुस्लिम त्यांच्याबद्दल अनादर दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या पूर्वजांना त्यांनी बरोबर घेतलेलं आहे. त्यांच्याबद्दल आम्ही अनादर दाखवूच कसा", असं हुसैन दलवाई म्हणाले. "बुलडोझर वगैरे चालवण्याचं युपीचं राजकारण इथले राजकारणी इथे का चालवतात ते मला कळत नाही. मी इथल्या राजकारण्यांना सांगू इच्छितो की, हा महाराष्ट्र आहे. हा छत्रपती शिवाजी महराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे शिवाजी महाराजांनी आमच्या पूर्वजांना सोबत घेतलं होतं. औरंगजेबाने घेतलं नव्हतं. आम्ही औरंगजेबाची स्तुती करण्याचा प्रश्नच नाही. माझ्या पूर्वजांना कुणी जवळ केलं होतं तर शिवाजी महाराजांनी केलं होतं. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी राज्य केलं होतं. शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या नितीमुल्ल्यांवरच हे राज्य असलं पाहिजे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचं हे राज्य असलं पाहिजे. इथल्या परंपरा वेगळ्या आहेत. जातीयवाद निर्माण करणारी परंपरा इथे नाही", असंही हुसैन दलवाई म्हणाले आहेत.
'औरंगजेबाबद्दल एवढं प्रेम असेल तर...', संजय शिरसाट यांचा निशाणा
हुसैन दलवाई यांच्या दाव्यावरुन शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. "हुसैन दलवाई वगैरे औरंगजेबाची पिलावड आहेत. त्यांना काही घेणंदेणं नाही. त्यांना औरंगजेबाबद्दल एवढं प्रेम असेल तर त्यांनी त्याची कबर त्यांच्याकडे घेऊन जावं ना. मनुस्मृती काय आणि इतर समाजात काय चालतंय त्यामध्ये डोकवण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही. त्यांची नैतिकता नाही. म्हणून असे स्टेटमेंट देऊन ब्राह्मण आणि इतर समाजात द्वेष कसा निर्माण होईल, हा प्रयत्न ते करत आहेत", अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/BOos4NI
No comments:
Post a Comment