संजय घारपुरे : गुजरात टायटन्सचा प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडा हा उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर झाले, आता त्यानंतर दोन दिवसांतच तो आयपीएलमधील लढत खेळणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कागिसो रबाडाबाबतची सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पाडली असल्याचे गुजरात टायटन्स संघाचे क्रिकेट संचालक विक्रम सोळंकी यांनी सोमवारी सांगितले.रबाडा हा दक्षिण आफ्रिकेतील टी-२० क्रिकेट लीगमध्ये ‘मुंबई इंडियन्स केप टाऊन’ संघाकडून खेळला होता. त्यात तो उत्तेजक चाचणीत दोषी ठरला होता. त्याला याबाबतचा निकाल एक एप्रिलला सांगण्यात आला होता. मात्र दोन दिवसांनी गुजरात टायटन्स संघाने रबाडा वैयक्तिक कारणास्तव घरी परतल्याचे सांगितले होते. अचानक शनिवारी रबाडाने आपण उत्तेजक चाचणीत दोषी ठरलो होतो अशी माहिती दिली.‘उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यानंतरची प्रक्रिया रबाडाने पूर्ण केली असून तो आयपीएलमध्ये खेळू शकतो’, असे दक्षिण आफ्रिका इन्स्टिट्यूट फॉर ड्रग फ्री स्पोर्ट्सने सोमवारी जाहीर केले. त्यामुळे रबाडावरील एक महिन्याच्या बंदीचा कालावधी पुरेसा आहे का याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र सोळंकी यांनी रबाडाबाबतची सर्व निर्णयाचे समर्थन केले.याबाबतची प्रक्रिया कोणा एका व्यक्तीने ठरवलेली नाही. किंवा कोण आहे, कोणत्या परिस्थितीत आहे, त्यावरून याबाबत निर्णय होत नसतो. सर्व परिस्थितीचा विचार करूनच त्याला खेळण्यास परवानगी दिलेली आहे. या सर्व निर्णय प्रक्रियेवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही. याबाबतचे नियम तयार करताना सर्व परिस्थिती लक्षात घेतलेलीच असेल. ते सर्वांसाठीच समान आहेत. रबाडाबाबतचा अहवाल लक्षात घेऊनच त्याच्यावर एका महिन्यांची बंदी घातली असणार, असे सोळंकी यांनी सांगितले. त्याचवेळी त्यांनी याबाबत आपले कोणतेही व्यक्तीगत मत नसल्याचेही स्पष्ट केले.कागिसो रबाडा हा मंगळवारी होणाऱ्या सामन्यासाठी संघनिवडीस उपलब्ध आहे. गेले एक महिनाभर सुरू असलेल्या निर्णय प्रक्रियेनंतरच हे ठरले आहे. आपल्याकडून चूक झाली हे त्याने मान्य केले आहे. त्याचवेळी तो त्याचा आवडता खेळ पुन्हा खेळण्यास उत्सुक आहे. या सर्वातून तो नक्कीच धडा शिकला असेल. त्याने संघासोबत सरावही सुरू केला आहे, असे सोळंकी यांनी सांगितले. मात्र त्याच्या आजच्या सामन्यातील समावेशाबाबत थेट काहीही भाष्य केले नाही.सोळंकी पुढे म्हणाले की, " आपल्या कृतीमुळे संघाचे लक्ष्य विचलीत होऊ नये हाच रबाडाचा प्रयत्न होता. हा प्रश्न त्याचा पूर्णपणे वैयक्तिक असला तरी आम्ही त्याला पूर्ण साथ दिली होती. आम्ही खेळाडूंना त्यांच्या मैदानावरील कामगिरीप्रमाणेच मैदानाबाहेरील प्रश्न सोडवण्यासही मदत करीत असतो. आता या प्रकरणामुळे त्याचे खेळातून पूर्णपणे लक्ष विचलीत होऊ नये यासाठीच आम्ही प्रयत्न केले. "
from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Apolf4x
No comments:
Post a Comment