संजय घारपुरे : शुभमन गिल अजूनपर्यंत भारताचा कर्णधार म्हणून पहिला कसोटी सामनाही खेळला नाही. पण त्यापूर्वीच त्याने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्याबरोबर असहमती दर्शवली आहे. जसप्रीत बुमराहबाबत गिलने आता एक मोठं वक्तव्य केलं असून ते गंभीर आणि आगरकर यांच्याशी जुळत नसल्याचे आता समोर आले आहे.‘इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेत जसप्रीत बुमराह तीनपेक्षा जास्त सामने खेळू शकतो,’ असे भारताचा कर्णधार शुभमन गिलने रविवारी स्पष्ट केले. राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बुमराह तीनच कसोटी खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, गिल त्यांच्या मताशी सहमत नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. बुमराह ऑस्ट्रेलियातील मालिकेत पाचही कसोटी खेळला. त्या मालिकेत त्याने भारताकडून सर्वाधिक षटके टाकली. त्यामुळे तो अखेरच्या कसोटीत चौथ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. एवढेच नव्हे तर त्याला पुढे चार महिने विश्रांती घेणे भाग पडले. त्यामुळे त्याला चॅम्पियन्स स्पर्धेसही मुकावे लागले होते. भारताने वर्ल्ड कप स्पर्धांचा दुष्काळ संपवताना गतवर्षी टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. त्यात बुमराहने मोलाची कामगिरी बजावली होती. पाच वर्षांपासून बुमराहच्या तंदुरुस्तीचा प्रश्न भारतीय संघास सतावत आहे. त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापन; तसेच निवड समितीने बुमराहचे सामने मर्यादित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुमराह इंग्लंडमधील मालिकेत तीनच कसोटी खेळणार असल्याचा निर्णय झाला. मात्र, हे गिलला पूर्ण मान्य नाही. ‘स्काय स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीत गिलला ‘बुमराह कोणत्या तीन कसोटी खेळणार’ अशी विचारणा करण्यात आली होती. त्या वेळी बोलताना गिल म्हणाला, ‘ बुमराह नेमके किती सामने खेळणार हे सांगता येणार नाही. प्रत्येक सामन्यातील परिस्थितीनुसार निर्णय होईल. कदाचित बुमराह खेळत असलेली संपूर्ण कसोटी पावसाने वाया जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर; तसेच सामन्यापूर्वी याबाबत अंतिम निर्णय घेणे योग्य होईल. संपलेल्या सामन्यात बुमराहने किती षटके टाकली? त्याच्यावर किती ताण आला? याचा आढावा घेऊनच निर्णय होईल. मालिका सुरू होण्यापूर्वीच तो कोणत्या सामन्यात खेळणार आणि कोणत्या सामन्यात नाही, याचा निर्णय घेता येणार नाही,’ असे गिलने सांगितले.
लक्ष्मण हंगामी प्रशिक्षक
गौतम गंभीर मायदेशी परतले असल्यामुळे भारतीय संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदाची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याचे समजते. लक्ष्मण हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे प्रमुख आहेत. त्याचबरोबर ते भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक आहेत. सध्या भारत ‘अ’ आणि आयुष म्हात्रे कर्णधार असलेला भारताचा १९ वर्षांखालील संघ इंग्लंडमध्येच आहेत. ‘अ’ संघाचा सध्या भारतीय संघाविरुद्ध सराव सामना सुरू आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील १९ वर्षांखालील संघातील मालिका १७ जूनपासून सुरू होणार आहे. गंभीर हे २० जूनला इंग्लंडमध्ये परतण्याची शक्यता आहे. तूर्तास तरी लक्ष्मण यांनी भारतीय संघासोबत राहण्यास प्राधान्य दिले आहे.गिल म्हणाला…
प्रशिक्षक, निवड समितीने माझ्यावर कुठलाही दबाव टाकलेला नाही.माझ्याच स्वत:कडून काही अपेक्षा आहेत. त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार.रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याकडून काही गुण नक्कीच घेणार.प्रशिक्षक गौतम गंभीर खेळाडूंचा मानसिक दृष्टिकोन जाणून घेत असतात.संघातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करणार.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/xeMRk5O
No comments:
Post a Comment