मुंबई: राज्यात दोन मुख्यमंत्री कारभार पाहत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेली असतानाच शिवसंग्रामचे नेते यांनीही राज्यातील ठाकरे सरकारची खिल्ली उडवली आहे. राज्यात दोन नव्हे, तीन मुख्यमंत्री आहेत. तिसरे मुख्यमंत्री तर सुप्रीम आहेत, असा टोला विनायक मेटे यांनी लगावला आहे. विनायक मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. राज्यात तीन मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री हे केवळ नावालाच मुख्यमंत्री आहेत. दुसरे मुख्यमंत्री हे अजित पवार असून ते मंत्रालयातून कारभार हाकत आहेत. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे तिसरे मुख्यमंत्री असून ते सुप्रीम मुख्यमंत्री आहे, असा टोला विनायक मेटे यांनी लगावला आहे. राज्यात तीन पक्षाचं सरकार असलं तरी खऱ्या अर्थाने दोनच पक्षाचं हे सरकार आहे. त्यातही हे तीन मुख्यमंत्री आहेत. चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात जे सांगितलं त्यात चुकीचं असं काहीच नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. दरम्यान, शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. आपण आंबा पडला असं म्हणतो, तसे पाटील आहेत. पाच वर्षापूर्वी पाटील काय होते? याचं त्यांनी भान असू द्यावं. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांची काय अवस्था होते हे सर्वांना माहीत आहे. हवं तर त्यांनी नारायण राणेंना विचारावं, असा टोला क्षीरसागर यांनी लगावला. कोणत्याही सरकारचा कारभार हा ढिंढोरा पिटून होत नसतो, हे चंद्रकांतदादांनीही माहीत आहे, तरीही त्यांच्या उलट्याबोंबा सुरू आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील आघाडी सरकारवर टीका केली होती. राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीत बसून असतात. मातोश्रीतूनच राज्याचा कारभार चालवत आहेत. तर दुसरे मुख्यमंत्री महाराष्ट्रभर फिरून महाराष्ट्र चालवत आहेत, ओळखा पाहू? असं म्हणंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. पाटील यांच्या या टीकेचा नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला होता. राज्यात ११ कोटी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येकाला आपण मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटत आहे. उद्या चंद्रकांत पाटील यांनाही तेच मुख्यमंत्री आहेत, असं वाटू शकतं, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2X5DHxo
No comments:
Post a Comment