Breaking

Wednesday, December 2, 2020

आठवडाभरात सर्वांसाठी लोकल सुरु? 'हे' नियम असणार बंधनकारक https://ift.tt/36zQkpi

म. टा. प्रतिनिधी, : लोकलअभावी सुरू असलेल्या सर्वसामान्यांच्या प्रवासयातना आता लवकरच संपणार आहेत. करोनाबाधितांच्या संख्येत होणारी घट लक्षात घेता, प्रशासनाने मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत लोकलमुभेची तारीख निश्चित होईल. यानंतर स्वस्त आणि आरामदायी प्रवासासाठी सर्वांना मुंबई लोकलचा पर्याय उपलब्ध होणार आहे. शहरातील लहान-मोठ्या चहाच्या टपऱ्यांपासून मॉल-हॉटेल पुन्हा सुरू झाली आहेत. सरकारी-खासगीसह सर्वच क्षेत्रांमधील दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. यामुळे करोनासह जगण्याची सवय आता मुंबईकरांच्या अंगवळणी पडल्याचे स्पष्ट होते. अशावेळी रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी अशा प्रवासात होणारी दमछाक टाळण्यासाठी आता उर्वरित प्रवासी वर्गाला देखील लोकलमुभा देण्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी असणार आहेत. १५ डिसेंबरनंतर सर्वांना लोकलमुभा देण्याची तयारी प्रशासनाने केली असून, या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सर्वांना लोकलमुभेनंतर मास्क वापरणे बंधनकारक असेल. सुरक्षित वावरसह अन्य नियम मोडणाऱ्या व्यक्तींकडून मोठ्या दंडाची रक्कम वसूल करण्यात येईल, असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेले मुंबईकर आता परतू लागले आहेत. परिणामी सध्या नियंत्रणात असलेला करोना पुन्हा वाढू नये. यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. आगामी आठवड्याच्या शेवटी अर्थात ११-१२ डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात करोना स्थितीचा आढावा घेऊन लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबई लोकलमध्ये सर्वांना प्रवेश देण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे सज्ज आहे. राज्य सरकारने निर्णय घेतल्यावर सर्वांना लोकलमुभा देण्यात येईल. सध्या ९० टक्के लोकल फेऱ्या धावत आहेत. सर्वांना लोकलमुभा दिल्यानंतर उर्वरित लोकल फेऱ्या तातडीने सुरू करण्यात येतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2KU7NR2

No comments:

Post a Comment