गडचिरोली: जिल्ह्यातील धानोरा-येरकड मार्गावर सालेभट्टी गावाजवळ काही तांत्रिक बिघाडामुळे मागील आठवड्यापासून उभ्या असलेल्या एका ट्रेलरच्या चालकाची त्याच्याच सहयोगी क्लीनरने काल दुपारी दोन ते तीन वाजताच्या सुमारास चाकू भोसकून केली. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. ट्रेलरच्या मालकाने बऱ्याच प्रतीक्षेनंतर चालकाच्या बँक खात्यात पैसे टाकले. त्या पैशांच्या मागणीच्या वादाचे पर्यावसन हत्येच्या घटनेत झाले, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. अन्नाराज एम. मारिया मिशेल ( रा.कालकाड, तमिळनाडू) असे मृत चालकाचे नाव असून, पोनमडसामी दशमुर्ती (रा. उत्तीरामुथ्थानपत्ती) असे हत्या करणाऱ्या क्लीनरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रेलर मागील सहा ते सात दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे धानोऱ्यापासून साधारणत: पाच किलोमीटर अंतरावर सालेभट्टी गावाजवळ दुरूस्तीच्या प्रतीक्षेत उभा केलेला होता. ट्रेलरचा चालक आणि क्लीनर दोघेही तिथेच होते. त्यांना पुढे छत्तीसगडला जायचे होते. आठवडाभर एकाच ठिकाणी असल्याने त्यांच्याकडील पैसेही संपले होते. त्यात ट्रेलरच्या मालकाने चालकाच्या बँक खात्यात १० हजार रुपये जमा केले होते. यातील काही पैसे क्लीनरने मागितल्यावरून वाद सुरू झाला. क्लीनरने चालकावर चाकूने वार केला. यात त्याचा मृत्यू झाला. चालक चाकू घेऊन अंगावर धावून आला होता. स्वसंरक्षण करताना चाकूहल्ल्यात चालक मारला गेल्याचे आरोपीने सांगितले. दरम्यान पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन क्लीनरला ताब्यात घेतले असून, चालकाचा मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास धानोरा पोलीस करीत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sMxeVR
No comments:
Post a Comment