गडचिरोली: जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात समाविष्ठ बुर्गी येथील माजी उपसरपंच रामा तलांडी (४०) यांची शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी बंदुकीची गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली. रामा तलांडी हे बुर्गी येथील एका लग्न समारंभात डीजे लावत असताना साध्या वेशात आलेल्या नक्षल्यांनी दोन गोळ्या झाडून जंगलात पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. यात रामा तलांडी यांचा जागेवरच मृत्यू झाला. रामा तलांडी हे गावात १० वर्ष उपसरपंच होते. नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. हत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मागील मार्च महिन्यात अबुझमाड च्या जंगलात नक्षल्यांच्या छोटा शस्त्र निर्मितीचा कारखाना उध्वस्त करण्यात सी-६० जवानांना यश आला होता. त्यानंतर चार जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. २४ मार्च रोजी नक्षल्यांनी आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर सी-६० जवानांना इशारा देणारे बॅनर लावले होते. २९ मार्च रोजी खोब्रामेंढा जंगलात पोलीस आणि नक्षल्यांचा चकमकीत नक्षली नेता भास्कर सह पाच नक्षली मारले गेले.एकंदरीत मार्च महिन्यात नक्षल चळवळीला खूप मोठा हादरा बसला. या घटनेच्या विरोधात १२ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन सुद्धा नक्षल्यांकडून करण्यात आलं आहे हे विशेष. बुर्गी येथे पोलीस मदत केंद्र असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं होता. रात्री गावातच पोलीस मदत केंद्राच्या जवळच्या परिसरात माजी उपसरपंच रामा तलांडी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39CP5qQ
No comments:
Post a Comment