मुंबई : करोनाबाधितांची दररोज वाढणारी संख्या आणि देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये लागू करण्यात आलेल्या मिनीलॉकडाउनचे पडसाद आज भांडवली बाजारावर उमटले. आज सोमवारी बाजारात झालेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्समध्ये तब्बल ११०० अंकांची घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०० अंकांनी घसरला. या पडझडीने गुंतवणूकदारांचे किमान तीन लाख कोटीचे नुकसान झाले आहे. सध्या सर्वच क्षेत्रात विक्रीचा सपाटा सुरु आहे. देशातील करोनाबाधितांचा आकडा एक लाखांवर गेला आहे. रविवारी महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने विकेंड लॉकडाउन घोषित केला आहे. दैनंदिन रुग्णवाढीमध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. तसेच राजस्थान, कर्नाटक या राज्यामध्ये करोना झपाट्याने फैलावत आहे. त्यामुळे संपूर्ण लॉकडाउनचे संकट गडद बनले असून औद्योगिक क्षेत्र धास्तावले आहे. देशात करोना संक्रमणाची स्थिती पुन्हा एकदा अतिशय गंभीर स्वरुप धारण करत असल्याचं समोर येतंय. देशात यंदाच्या वर्षातच नाही तर करोना संक्रमणा दरम्यान आतापर्यंतच्या आकडेवारीत पहिल्यांदाच करोना संक्रमितांच्या एका दिवसाच्या आकड्यानं लाखांचा टप्पा सहजच पार केलेला दिसतोय. सोमवारी सकाळी भारतात करोना संक्रमणाचे १.०३ लाख रुग्ण आढळल्याचं आकडेवारी दर्शवतेय. देशात यापूर्वी १६ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक संख्येची नोंद करण्यात आली होती. या दिवशी देशात एका दिवसात ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. आरोग्य मंत्रालयानं सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी एकाच दिवशी १ लाख ०३ हजार ५५८ संक्रमित रुग्णांची भर पडलीय. या दिवशी ५२ हजार ८४७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रविवारी एकाच दिवशी तब्बल ४७८ मृत्यूंची नोंद करण्यात आलीय. आजच्या पडझडीत बँका आणि वित्त संस्थांच्या शेअरला मोठी झळ बसली आहे. यात एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, एल अँड टी या शेअरमध्ये घसरण झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एचसीएल टेक, टीसीएस, इन्फोसिस आदी शेअर सावरले आहेत. आज बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये ३०० अंकांची घसरण झाली होती. पुढे चौफेर विक्री सुरू झाली आणि सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला. सध्या सेन्सेक्स ११९५ अंकांनी घसरला असून तो ४८४४६ अंकांवर आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३३१ अंकांनी घसरला असून तो १४५३५ अंकावर ट्रेड करत आहे. आजच्या पडझडीने गुंतवणूकदारांचे किमान तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3sUIz6q
No comments:
Post a Comment