Breaking

Thursday, April 1, 2021

पुणे : लग्नातील आहेरांवर डल्ला; आरोपीला अटक https://ift.tt/3rS7GFH

म. टा. वृत्तसेवा, जुन्नर आजही प्रत्येक लग्नात नातेवाइक, पै-पाहुणे, मित्रांकडून वधू-वरांना आहेर देण्याची परंपरा पाळली जाते. अनेक जण वस्तू स्वरूपात, तर अनेक जण रोख रकमेच्या स्वरूपात आहेर देत असतात. आहेर स्वीकारण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांकडील 'खास' माणसाकडे दिलेली असते. मात्र, एका चोराने याच परंपरेचा गैरफायदा घेऊन चक्क लग्नातील आहेरावर डल्ला मारण्याची शक्कल शोधली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याने अनेक लग्नांत असा प्रकार केल्याचे समोर आले आहे. संदीप सगन धोतरे (रा. पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी रूपाली चंद्रशेखर बेनके (वय ३९, रा. लालखन हिवरे, ता. जुन्नर)यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोतरे हा परिसरात एखादे लग्न असल्यास तेथे जात होता. एखाद्या पाहुण्याची ओळख काढून तो आहेर गोळा करत होता. या पाकिटांतील रकमा कोणाचेही लक्ष नसताना काढून घेत होता. यामध्ये चांगली कमाई होत असल्याचे लक्षात आल्याने त्याने अनेक लग्नांत चोरीची ही शक्कल लढवली. मात्र, जादा रकमेच्या प्रलोभनामुळे तो पकडला गेला. फिर्यादी रूपाली बेनके यांच्या पुतणीचे १६ फेब्रुवारीला ओतूर येथे लग्न झाले. तेथे त्याने आठ हजार ५०० रुपयांच्या आहेराच्या रकमेचा अपहार केला. एवढी मोठी रक्कम गायब झाल्याने नातेवाइकांनी शोध घेतला असता हा प्रकार समोर आला. या प्रकरणी धोतरेच्या विरोधात ओतूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस नाईक एन. बी. गोराणे, मुकुंद मोरे, पंकज पारखे यांचे पथक तपास करत होते. अखेर ३० मार्च रोजी ओतूर येथील शुभश्री लॉन्स कार्यालयातून पोलिसांनी त्याला अटक केली. अशी करत होता चोरी करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मर्यादित उपस्थितीत लग्न सोहळे साजरे होत आहेत. या काळातही आरोपी संदीप धोतरे याने चोरी करणे सोडले नाही. रूबाबदार कपडे, खिशात महागडा मोबाइल, तोंडाला मास्क, कपाळावर कुंकवाचा नाम, डोक्यात गांधी टोपी असा पेहराव करून तो स्वत: लग्नघरातील सदस्य असल्याचे भासवत होता. यामुळे दोन्हीकडील मंडळींना तो वधू किंवा वराकडील जवळचा पाहुणा असल्याचे वाटायचे. यामुळे सहसा त्याच्यावर कोणी संशय घेत नसत. आरोपी स्टेजच्या एका कोपऱ्यात ठाण मांडून बसत होता. विवाहाला आलेले अनेक पाहुणे स्टेजवर जाताना त्याच्याकडेच आहेर पाकिटे देत असत, अशी माहिती तपासात समोर आली आहे. 'सीसीटीव्ही' फुटेजच्या आधारे आरोपी संदीप धोतरे याचा शोध घेण्यात आला. तो पिंपळगाव जोगे येथील मंगल कार्यालयात असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. लग्नाच्या धामधुमीत अशा प्रकारे संधी साधणाऱ्या व्यक्तींपासून नागरिकांनी सावध राहायला हवे. फसवणूक झालेल्या काही जणांनी आरोपीच्या अटकेनंतर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला आहे. आणखीही कोणाच्या लग्नकार्यात असा प्रकार घडला असल्यास नागरिकांनी लेखी तक्रार द्यावी. - परशुराम कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक, ओतूर पोलिस ठाणे


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2PR4P2o

No comments:

Post a Comment