: स्थानिक आयकॉन हॉस्पिटल येथे शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक गणेश गुरबाणी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सदर प्रकरणी ऑक्सिजन अभावी आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा लोकेश गुरबाणी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे करत या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. या मागणीला अनुसरून जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यीय चौकशी समिती स्थापन करत संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या आदेशाने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरातील आयकॉन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे करोना उपचारासाठी व्यावसायिक गणेश गुरबाणी दाखल झाले होते. काही काळ रूममध्ये राहिल्यावर त्यांना घाईघाईने आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे नातेवाईक यांचं म्हणणं आहे. आयसीयूमध्ये असताना रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे गणेश गुरबाणी यांचा १८ मे रोजी मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर केला होता. तसंच त्याच दिवशी इतरही काही रुग्णांचा मृत्यूसुद्धा ऑक्सिजन अभावी झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असून सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास सत्यता बाहेर येणार असल्याचा दावा ते करत आहे. सदर प्रकरणी गणेश गुरबाणी यांचे चिरंजीव लोकेश गुरबाणी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी पापळकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याकरता ५ जणांची चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी त्यादिवशीचं रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासण्याची मागणी लोकेश गुरबाणी यांनी केली. सोबतच गठीत चौकशी समिती ही रुग्णालयांची निष्पक्ष चौकशी करेल जेणेकरून या प्रकरणाची संपूर्ण सत्यता समोर येईल अशी आशा गुरबाणी यांच्या परिवाराने यावेळी व्यक्त केली. पोलिसांना असहकार्य, चौकशी समितीला सहकार्य करणार का ? दिवंगत गणेश गुरबाणी यांच्या मृत्यूला आयकॉन रुग्णालय प्रशासन जबाबदार असून ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. त्यावेळी रामदासपेठ पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मागितलं असता ते त्यांना सादर करण्यात आलं नसून त्यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना कुठलेच सहकार्य करण्यात आले नसल्याचा आरोप आहे. पोलिसांना सहकार्य न करणारे आयकॉन रुग्णालय प्रशासन हे चौकशी समितीला सहकार्य करणार का? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2SbpQpP
No comments:
Post a Comment