Breaking

Tuesday, June 1, 2021

निर्बंध सवलतीत डावे-उजवे; मुंबई- ठाण्यात वेगवेगळे नियम https://ift.tt/3pdFg9h

म. टा. प्रतिनिधी मुंबई: करोना निर्बंधांमध्ये शिथिलता आणताना महापालिकानिहाय वेगवेगळा निर्णय घेण्यात आला आहे. या वेगवेगळ्या निर्णयावर व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला. यामुळे संभ्रम आणखी वाढल्याचे मुंबईत व्यापारी व व्यावसायिकांचे मत आहे. करोना लाट आवाक्यात आल्यामुळे त्यासंबंधी 'ब्रेक द चेन' निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू झाली. पण हे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय त्या-त्या महापालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनावर सोडला आहे. यामुळेच दोन महापालिका क्षेत्रात वेगवेगळा निर्णय झाला आहे. त्यामुळे संभ्रम वाढला आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात अत्यावश्यक वगळता उर्वरित सर्व दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ दरम्यान एकदिवसाआड सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली. उजवीकडील दुकाने तीन दिवस तर डावीकडील दुकाने दोन दिवस, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तर ठाणे महापालिका क्षेत्रात अत्यावश्यकखेरीज उर्वरित सर्व दुकानांना सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी ७ ते दुपारी २पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. परंतु मुंबई व ठाणे हे व्यापारिक, आर्थिकदृष्ट्या एकमेकांशी संलग्न आहेत. त्यामुळेच या दोन महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या नियमांचा व्यापाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) मुंबई महानगर प्रदेशाध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले, 'मुंबई महापालिकेने डावे-उजवे, असा जो निर्णय घेतला, तोच मुळात चुकीचा आहे. डावी आणि उजवी बाजू नेमकी कुठून ग्राह्य धरायची, असा वाद यातून निर्माण होतो. या निर्णयाद्वारे व्यापाऱ्यांना आपसात लढविण्याचाच प्रशासनाचा डाव आहे. तर दुसरीकडे ठाण्यात सर्व दुकाने सुरू राहणार आहेत. यामुळे ठाणे व मुंबईच्या व्यापाऱ्यांमध्ये वाद निर्माण होईल. मुळात संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रासाठी ग्रामीण भाग वगळता एकसारखा निर्णय हवा. कारण हे क्षेत्र व्यवसायाने एकमेकांशी संलग्न आहे. ई-कॉमर्सबाबत आक्षेप दरम्यान, ई-कॉमर्सच्या परवानगीमुळेही गोंधळ निर्माण झाला आहे. एकीकडे दुकानांना दुपारी २पर्यंत व्यवसायाचीच परवानगी असताना ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी मिळाल्याने त्याद्वारे २४ तास ग्राहक सामान खरेदी करतील. याचा सर्वसामान्य दुकानदारांना जबर फटका बसेल, असेही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई : अत्यावश्यक वगळता उर्वरित दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ दरम्यान एकदिवसाआड सुरू. उजवीकडील दुकाने तीन दिवस तर डावीकडील दुकाने दोन दिवस उघडी. ठाणे : अत्यावश्यकखेरीज उर्वरित सर्व दुकानांना सोमवार ते शुक्रवारदरम्यान सकाळी ७ ते दुपारी २पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी. उजव्या-डाव्या दिशेबाबत नियम नाही.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pbFFJi

No comments:

Post a Comment