Breaking

Saturday, July 31, 2021

मटा विशेष: पाऊस असा का पडतो... https://ift.tt/3yuUryR

आतुरतेने ज्‍याची वाट पाहावी असा हा पाऊस आणि . हाच पाऊस हाहाकारही माजवतो. या वर्षीही याने महाराष्‍ट्र आणि देशात अनेक ठिकाणी झोडपून काढले. इतकेच नव्‍हे, तर दाणादाण केली, उत्‍पात माजवला. कोल्‍हापूर, पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोकण, मराठवाडा, विदर्भ अशी सर्वत्र जीवित आणि वित्तहानी झाली. जे वाचले, तेही जीव मुठीत धरून होते. मागे गावच्‍या गावे उध्वस्‍त झाली आहेत. काही वर्षांपूर्वीचे गाव माळीण, तर या वर्षीचे गाव तळीये. आत्ताच महाराष्‍ट्रात अडीच ते पाच लाख एकर शेती अतिवृष्‍टीमुळे नेस्‍तनाबूद झाली आहे. असा कसा हा भारतीय पावसाळा? आल्‍याशिवाय आपले चालत नाही आणि आल्‍यावर सावरता-पळता भुई थोडी होते. एकाच वर्षात कधी (किंवा कुठे) अतिवृष्‍टी, तर त्‍याच वर्षी कधी (किंवा कुठे) भयंकर अवर्षण. या अशा भारतीय पावसाळ्याचे रहस्‍य, मुळातच सुरुवातीपासून त्‍याच्‍या लहरी वागणुकीचा स्‍वभाव आणि होणारे परिणाम, यांविषयी भारतीय हवामान शास्‍त्राचे पितामह डॉ. पिशारोती यांचे संशोधन, काम व प्रबोधन मोलाचे आहे. त्‍यांचे सहकारी व नंतर कामे पुढे नेणारे वसंत गोवारीकर हे आपल्‍याला ऐकून माहीत आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटिऑरॉलॉजी (आयआयटीएम), म्‍हणजे भारतीय हवामान संस्‍था, भारतीय हवामान विभाग (आयएमडी) व राष्‍ट्रीय भौतिकशास्‍त्र संस्‍था (नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी) यांमधे डॉ. पिशारोती यांची प्रमुख भूमिका व नेतृत्‍व होते. बऱ्याच वर्षांपूर्वी गांधीजींच्‍या सेवाग्रामला आम्‍ही एक राष्‍ट्रीय परिसंवाद व कार्यशाळा आयोजित केली होते. त्‍यात या विषयावर मांडणी करण्‍यासाठी व चर्चेत सहभागी होण्‍यासाठी डॉ. पिशारोती यांना आमंत्रित केले होते. ते दोन दिवस आमच्‍यासोबत राहिले व भारतीय पावसाचे दोन महत्त्वाचे मुद्दे त्‍यांनी मांडले : १. देशभर एकशेदहा ठिकाणी बसवलेल्‍या स्‍वयंचलित पर्जन्‍यमापक यंत्रणेतून ढळढळीतपणे सर्वसामान्‍य सूत्र हाती लागले. जिथे जितके सेंटीमीटर पाऊस वर्षभरात पडतो (अल्‍प असो की अति), त्‍यापैकी अर्धा पाऊस हा फक्‍त त्‍या सेंमी आकड्याच्‍या पंचमांश तासात बरसून जातो. उदा. एका ठिकाणी वर्षभरात शंभर सेंमी पाऊस पडतो, तर त्‍यापैकी अर्धा पाऊस, म्‍हणजे पन्‍नास सेंमी. इतका मोठा हिस्‍सा पाऊस फक्‍त वर्षभरातील वीस तासांत (शंभरच्‍या पंचमांश) कोसळतो किंवा जेथे पंचवीस सेंमी पाऊस वर्षभरात पडतो, तेथेही त्‍यापैकी साडेबारा सेंमी इतका मोठा भाग वर्षभरातील केवळ पाच तासांत पडून मोकळा होतो. २. जगातील इतर भागांच्‍या तुलनेत भारतीय पावसाच्‍या थेंबाच्‍या आकाराचे वेगळेपण महत्त्वाचे आहे. इतरत्र पडणाऱ्या वर्षणाच्‍या (पाऊस, हिम) थेंबाचा आकार जेवढा असतो, त्‍यापेक्षा भारतीय पावसाच्‍या थेंबाचा आकार बराच मोठा असतो. थेंबाच्‍या आकाराचे हे मोठेपण अनेक बाबतींत महत्त्वाचे परिणाम करते. थेंबांचे आकारमान केवळ दुप्‍पट झाले, तरी तो ज्‍या पृष्‍ठभागावर पडतो, त्‍यावर होणारा आघात दुप्‍पट एवढाच नसून, अनेक पटींनी जास्‍त असतो. या वैशिष्‍ट्यांचा अन्‍वयार्थ १. फार थोड्या वेळात जोरदार बरसून निघून जाणारा असल्‍यामुळे, अतिवृष्‍टी व अवर्षण होते. त्यातही एक मोठी मजेची बाजू अशी, की लहरी असला तरी येतो मात्र दर वर्षी. जगात अनेक भाग असे आहेत, की तेथे वर्षामागून वर्षे गेले, तरी पावसाचा थेंबही पडत नाही. त्‍या मानाने मान्‍सूनचा पावसाळा दर वर्षी येणे हे भारतीय उपखंडासाठी वरदानच मानले पाहिजे. पावसाळ्याने मिळणाऱ्या बहुमूल्‍य पाण्‍याचे सुनियोजित ग्रहण, संरक्षण, जतन व संवर्धन करणे निकडीचे आहे. थोड्या वेळात जोरदार पडणाऱ्या आणि नंतर खंड पडणाऱ्या किंवा निघून जाणाऱ्या या पावसाळ्याशी व पाण्‍याशी आपण स्‍वतः नीट वागले पाहिजे. तो लहरी आहे व राहणारच; पण त्‍याला झेलणे, आपले वागणे, आपली धोरणे आणि संरचना हे सर्व आपण करण्‍याची जबाबदारी आहे. २. या पावसाच्‍या थेंबाचा आकार मोठा असतो आणि त्‍याचा आघात पृष्‍ठभगावर कैक पटींनी वाढीव असतो. त्यांचा जमिनीवर, मातीवर बसणारा तडाखा आणि रट्टा जास्‍त जोरात असतो. त्‍यापासून घडणारे मातीच्‍या कणांचे विघटन आणि मातीची धूप हेही प्रचंड प्रमाणात होते. पावसाळा आणि हवामान बदल भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) काही वर्षांपूर्वीच आणखीन एक जळजळीत वास्‍तव लक्षात आणून दिले. गेल्‍या शंभर वर्षांच्‍या भारतीय पावसाळ्याचा व मान्‍सूनचा अभ्‍यास केल्‍यावर हे लक्षात येते, की शंभर वर्षांतली बत्तीस वर्षे प्रतिकूल पावसाळ्याची होती. पैकी एकोणीस वर्षे अतिवृष्‍टीची व तेरा वर्षे अवर्षणाची. म्‍हणजे, दर तीन वर्षात एक वर्ष प्रतिकूल पावसाळा. त्‍याही नंतर अनेक कृषी विद्यापीठांच्‍या हवामान विषयक अभ्‍यासातून निष्‍कर्ष निघाले आहेत, की आता जागतिक हवामान बदलाच्‍या दुष्‍परिणामांमुळे हे प्रमाण दीडपट वाढले आहे. म्‍हणजे, दर तीन वर्षातले दीड वर्ष प्रतिकूल घडते. भारताबाहेरही जागतिक हवामान बदलाचे संकट व बिघडलेले वर्तन हे त्‍यातलेच एक महत्त्वाचे वास्‍तव. यावर दोन तऱ्हेचे उपाय करायचे ठरवले जाते. एक, मिटिगेशन (शमन) व दुसरे अॅडाप्‍टेशन (अनुकूलन). शमन म्‍हणजे, हवेत सोडल्‍या जाणाऱ्या हरितगृह वायू (ग्रीन हाउस गॅसेस)चे प्रमाण कमी करणे, शून्‍यावर आणून निदान आहे त्‍या स्थितीवर स्थिरावणे आणि दुसरे, अनुकूलन म्‍हणजे, बदललेल्‍या प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देऊ शकतील असे अनुकूल मार्ग व तंत्रे चोखाळणे. वृक्षांचे महत्त्व वरील मुद्यांमुळे लक्षात यावे, की पावसाचे पाणी झेलणारे, धरणारे, आघातापासून बहुमूल्‍य मातीचा बचाव करणारे, पाणी जमिनीत मुरवणारे आणि पुरेसा पाऊस पाडण्‍यासाठी स्‍थानिक वातावरणीय स्थिती निर्माण करणे, अशी अनेकविध कामगिरी करणारे सहज सोपे; पण महत्त्वाचे उपाय आहेत वृक्ष. त्यासाठी, एकीकडे नवी रोपे लावणे, जगवणे, वाढवणे गरजेचे आहेच; पण सोबत दुसरीकडे, असलेले, वाढलेले वृक्ष बचावणेही तेवढेच निकडीचे आहे. दहा किंवा शंभर किंवा हजार वृक्षांची रोपटी (किती जगवली जातील, वाढवली जातील?) ही पन्‍नास वर्षांच्‍या डेरेदार वृक्षाची बरोबरी करू शकत नाहीत. हे उपाय कृतीत आणणारे विकासाचे धोरण व पद्धती यांचा अंगीकार ही काळाची निकड आहे. या मोठ्या कामात देशातल्‍या विविध घटकांचे योगदान गरजेचे आहे. सरकार आणि नागरिकांच्या बहुविध उपक्रमांची जोडगोळी होऊन, त्यांना दोन्‍ही बाजूंकडून बळकट प्रतिसाद व मदत व्‍हायला हवी. निसर्ग व सृष्‍टीबद्दल मानवाच्‍या मनात आदरभाव आणि परमभाव असावा यांसाठी वृक्ष बचावाचे महत्त्व आहे. त्‍याशिवाय मानव बचावासाठीही ती एक अट व मार्गदर्शक तत्त्‍व ठरते. वृक्षतोडीचे विघातक काम विकासाच्‍या नावाने फार मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. विकास हवाच; पण पर्यावरण व वृक्षांना सांभाळून, शक्‍यतो संवर्धित करून व्‍हावा. भारतासह सर्व देशांच्‍या सरकारांनी जागतिक पातळीवर मान्‍य केलेल्‍या शाश्‍वत विकास उद्दिष्‍टांचा महत्त्वाचा भाग आहे 'वृक्ष बचाव, वृक्ष बढाव.' वृक्ष तोडले जाऊच नयेत, असे एकांगी धोरण किंवा आग्रह नाही. निरुपाय झाल्‍यास त्‍याचा विचारही क्रमप्राप्‍त ठरू शकतो; पण सध्‍या (अल्‍पदृष्‍टी) विकासाच्‍या नावाने किंवा काहींच्‍या स्‍वार्थासाठी सरकारांद्वारेच प्रचंड वृक्षतोडीला हातभार लागत असल्‍याचे दिसते आहे. त्‍यात महत्त्वाचे एक निमित्त रस्ते बनविण्‍याचे. देशात आणि महाराष्‍ट्रातही कित्‍येक ठिकाणी अशा जखमा केल्‍या जात आहेत. मुंबईच्‍या आरे परिसराच्‍या जंगलात, नागपूरला अजनी परिसरात, विदर्भातही इतरत्र- परतवाडा, अकोला, वर्धा-सेवाग्राम ही यामधील काही उदाहरणे. वृक्ष बचाव नागरिक समिती वर्धा-सेवाग्राममधील नागरिकांच्‍या या समितीच्‍या पुढाकाराने, गेल्‍या अकरा महिन्‍यांपासून चाललेले उपक्रम दखल घेण्‍यासारखे आहेत; कारण गांधीजींच्‍या सेवाग्राम आश्रम या जागतिक महत्त्वाच्‍या स्‍मारकापर्यंत व प्रेरणास्‍थळाशी संबंध असणाऱ्या रस्‍त्‍यांशी ते निगडित आहेत. रस्‍त्‍यालगतची मोठी झाडे शक्‍यतो न कापणे, रस्‍ताच थोडा वळवणे, रस्‍त्‍याची रुंदी फार वाढवण्‍याचे सोडून मर्यादित करणे, गरज असेल तेथे फांद्या छाटून मुख्‍य झाड कायम ठेवणे अशा नागरिक समितीच्‍या सूचना व्‍यावहारिक आणि मोलाच्‍या आहेत. त्यातही काही अडचणी भासल्‍यास, सरकारने नागरिक समितीला विश्‍वासात घेऊन संवाद साधणे, सुरुवातीला किंवा मधे जनसुनावणी आयोजित करणे, या आणि अशा अनेक सूचना नागरिकांनी केल्‍यात. या समितीमधे सर्व प्रकारच्‍या नागरिकांबरोबर वैज्ञानिकही आहेत. या आघाडीची भूमिका लोक आणि निसर्ग यांच्‍या बचावासाठी वृक्ष बचाव, अशी आहे. सुजाण विकासाचा हा शहाणा मार्ग आहे. वृक्ष बचाव वर्धा नागरिक समितीने काही उपयुक्‍त मुद्दे सुचवले आहेत : १. शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करण्‍याचे उद्दिष्‍ट ठेवावे, अल्‍पकालीक विकासाचे नव्‍हे. रस्‍ते बनवताना वृक्ष वाचवावेत. टाळणे शक्‍य नसेल तेथे अपरिहार्य असल्‍यासच वृक्षतोडीचा विचार करावा. २. रस्‍ते फार रुंद व सरळ केल्‍यामुळे वाहतुकीचा वेग बेसुमार वाढून, रस्‍त्‍याजवळील भागांत अपघात वाढू शकतात. सन २०१८मध्ये देशात साडेचार लाख रस्ते अपघात झाले, त्‍यात दीड लाख लोक मेले (मिनिस्‍ट्री ऑफ रोड ट्रान्‍सपोर्ट डेटा २०१८). यामागील महत्त्वाचे कारण, वाहनांचा सुसाट गतीचा हव्‍यास, हे आहे. जे महामार्ग नाहीत किंवा जे मार्ग वस्‍तीच्‍या जवळ आहेत, त्‍यांच्‍यासाठी हे तत्त्‍व लक्षात ठेवावे. ३. नव्‍या कायदेशीर मार्गदर्शक तत्त्‍वाप्रमाणे, महत्त्वाच्‍या वारसा स्‍मारकांजवळील झाडांचे संरक्षण व्‍हायला हवे. वारसा क्षेत्रातील ५० वर्षे वा अधिक वयाचे वृक्ष तोडू नयेत. ४. नागरिकांचे म्‍हणणे सरकारने सहानुभू‍तीने ऐकणे, समजून घेणे, धोरणांत व निर्णयांत समावेश करणे, ही पद्धत असावी. दिरंगाई होणे, गुपचूप निर्णय फिरवले जाणे, चकवे दिले जाणे, असे घडू नये. ५. शहराबाहेरून बायपास महामार्ग बनवावा. नागरिकांचे जगणे सुसह्य व्‍हावे यासाठी, शहरातील व शहराजवळील रस्‍त्‍यांवर (वाहनांची गती जास्‍त राहण्‍याकरिता) होणारी वृक्षतोड होऊ नये. सृष्‍टी आणि मानवाच्या रक्षणासाठी यासाठी वृक्ष वाचवणे हा एकमेव उपाय आहे असे एकांगी म्‍हणणे नसून, तो अतिशय महत्त्वाचा आणि अग्रक्रमाचा मुद्दा आहे. हा उपाय सहज सोपा आहे, आपल्‍या हातातला आहे आणि आजच फायदा देणारा आहे. मानवी विकास आणि सृष्टी यांचा संबंध फूल आणि मधमाशीप्रमाणे असावा. ते परस्परांना देतात आणि घेतात. हे करताना, एकमेकांना इजा करत नाहीत आणि त्यातून दोघेही समृद्ध होत असतात. (लेखक ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक आहेत.)


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2TNmMBh

No comments:

Post a Comment