अमरावती : पावसाळ्यात घरात साप आढळणे साहजिक बाब आहे. मात्र, एकाच वेळी २२ जहाल विषारी साप एकाच घरात आढळण्याची घटना उत्तमसरा गावात घडली. या बातमीने फक्त घरातल्यांचीच नाहीतर संपूर्ण गावची झोप उडाली आहे. दिवस भराच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सदर कोब्रा सापांची जंगलात रवानगी करण्यात आली. अधिक माहितीनुसार, भातकुली तालुक्यातील उत्तमसरा गावाचे रहिवासी मंगेश सायंके हे कुटुंबासोबत काही दिवसांसाठी बाहेर गावी गेले होते. गावावरून परत येताच त्यांना घराच्या दाराजवळ सापाची लहानशी कात दिसली. रात्रीच्या वेळेस झोपण्याकरिता अंथरून टाकताच त्यातुन सापाचे पिल्लू बाहेर आले. अंथरुणात साप बघताच मंदा सायंके यांनी आरडाओरडा करत मुलांनासोबत घेत घरा बाहेर धाव घेतली. साप निघाल्याची माहिती तात्काळ वसा संस्थेचे अनिमल्स रेस्क्युअर भूषण सायंके यांना दिली. भूषण यांनी ते पिल्लू कोब्रा जातीच्या सापाचे असल्याचे सांगत त्याना रेस्क्यू केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाक घरातील तुराटीच्या कुडावर सापाची आणखी दोन पिल्ले दिसल्याने तात्काळ वसाचे अनिमल्स रेस्क्युअर तिथे दाखल झाले. ती दोन पिल्लंसुद्धा जहाल विषारी कोब्रा सापाचे असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर त्वरित तो तुरट्याचा कुड काढण्यात आला आणि एक एक करता दिवसभरात तब्बल २२ कोब्रा सापाचे पिल्लं बाहेर काढण्यात आली. वसाचे अनिमल्स रेस्क्युअर भूषण सायंके, पंकज मालवे यांनी या सर्व पिल्लांना रेस्क्यू करून वन विभागात सर्व पिल्लांची नोंद केली आणि पिल्लांना नजीकच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. खरंतर, तीन वर्षांपूर्वी उत्तमसरा गावात विषारी घोणस जातीच्या ३७ पिल्लांसह मादी सापाचा रेस्क्यू वसा संस्थेचे अनिमल्स रेस्क्युअर शुभम सायंके आणि भूषण सायंके यांनी केला होता. आज तीन वर्षांनंतर या घटनेची पुननावृत्ती होत आहे. या घटनेमुळे अजूनही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पावसाचे दिवस असल्याने नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jaYRo5
No comments:
Post a Comment