म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः सरकारी बँकांतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना यापुढे या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या शेवटच्या वेतनाच्या ३० टक्के रक्कम फॅमिली पेन्शन (कुटुंब निवृत्तीवेतन) म्हणून मिळणार आहे. फॅमिली पेन्शनची रक्कम यापूर्वी ९,२८४ रुपये मिळत असे, ती आता सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांहून अधिक मिळेल. केंद्र सरकारने असा बदल केल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत बुधवारी केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव देबाशीष पांडा यांनी केली. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसाठी द्वीपक्षीय तोडगा काढण्यासाठी अकरावी बैठक, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी झाली होती. त्या बैठकीत, भारतीय बँक संघटना आणि इतर संघटनांनी स्वाक्षरी केली होती. त्याच बैठकीत, राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत (एनपीएस) दिल्या जाणाऱ्या फॅमिली पेन्शनमध्ये वाढ करण्याचा तसेच, यातील बँकांकडून भरल्या जाणाऱ्या योगदानातही वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, अशी पांडा यांनी दिली. 'काँग्रेसनेही केले होते चलनीकरण' 'काँग्रेस सरकारच्या काळातच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे आठ हजार कोटी रुपयांना चलनीकरण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे यूपीए काळात नवी दिल्ली रेल्वे स्थानक भाडेपट्टीने देण्याचा प्रस्ताव मांडला गेला होता. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय चलनीकरण उपक्रमाची अधिसूचना फाडून टाकली; मात्र त्यावेळी त्यांच्या सरकारच्या काळातील चलनीकरणाची कागदपत्रे का नाही फाडून दाखवली?' असा सवालही सीतारामन यांनी केला. काँग्रेस काळात झालेल्या सरकारी मत्तांच्या चलनीकरणाचे पुरावे सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांना दाखवले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3zjmxgT
No comments:
Post a Comment