दुकाने रात्री दहापर्यंत खुली; मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृहे कुलुपबंदच म. टा. प्रतिनिधी, ठाणे: करोना प्रतिबंधक निर्बंधांतून मुंबईकरांना किंचित दिलासा मिळाल्यानंतर ठाणे, नवी मुंबईचेही त्याच पावलावर पाऊल पडले आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागासाठी निर्बंध शिथिल करणारे नवे आदेश मंगळवारी जारी केले. अत्यावश्यक दुकानांना आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री दहापर्यंत तर इतर दुकानांना सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा दिल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. हॉटेल, उपहारगृहांना ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत तर पूर्णवेळ पार्सल सेवा देता येणार आहे. परंतु मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृहांवरील निर्बंध शिथिल होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. जून महिन्यापासून कुलुपबंद असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीस दुसऱ्या गटामध्ये समावेश करून मोठा दिलासा दिला होता. परंतु त्यानंतर पुन्हा 'डेल्टा'च्या संकटामुळे या शहरांमधील निर्बंध कडक झाले होते. राज्य सरकारच्या नव्या निर्देशानुसार ठाण्यातील निर्बंध मुंबईपेक्षा अधिक शिथिल होतील, अशी अपेक्षा होती. परंतु मंगळवारी मुंबईच्या धर्तीवरच नव्या निर्णयामुळे नागरिकांची निराशा झाली आहे. शिवाय ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांची गरज असलेल्या लोकलसेवेमध्येही प्रवेशबंदी कायम ठेवल्याने नागरिकांमधील नाराजीची सूर आहे. मुंबईच्या धर्तीवरच निर्णय घेतला जाणार असताना तो जाहीर करण्यासाठी २४ तासांचा अतिरिक्त कालावधी का लागला, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. करोना नियंत्रणाच्या निकषानुसार दुसऱ्या गटांमध्ये येणाऱ्या ठाणे जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या गटामध्येच ठेवण्यात आल्याने शहरातील अनेक व्यवहार अद्याप कुलुपबंदच राहणार असल्याने हा अंशत: दिलासा असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3A4Nogz
No comments:
Post a Comment