Breaking

Wednesday, August 4, 2021

वर्सोवा किनाऱ्याला कुंपण? चौपाटी नष्ट होण्याची भीती https://ift.tt/3AdxGj6

म. टा. विशेष प्रतिनिधी, महापूराचे संकट रोखण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील भागांमध्ये संरक्षक भिंत बांधण्याच्या पर्यायाला पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध होत असतानाच, मुंबईतील येथील समुद्रकिनाऱ्यावर वाळूमध्येच सिमेंट-काँक्रिटची भिंत उभारली जात असल्याचे समोर आले आहे. धूप रोखण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या संरक्षक भिंतीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, या ऐन वाळूत उभारल्या जात असलेल्या या भिंतीमुळे या भागाचे वैभव असलेला हा वाळूचा संपूर्ण किनाराच नष्ट होईल, अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत. यासंदर्भात राज्यकर्ते, स्थानिक प्रशासन यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वर्सोव्याच्या किनाऱ्यावर गेले दोन आठवडे सातत्याने जेसीबीचा, खणण्याचा आवाज होत आहे. इतर वेळी शांत समुद्राच्या लाटांची गाज ऐकणारे स्थानिक रहिवासी या आवाजामुळे चिंतेत पडले आहेत. येथील इमारतींच्या मूळ कुंपणापासून सुमारे ३० फूट लांब, थेट वाळूमध्येच ही भिंत उभारली जात आहे. या दोन्हीमध्ये जॉगिंग ट्रॅक बनवला जात आहे. काही ठिकाणी टेट्रापॉड्सही टाकण्यात आले आहेत. यासाठी स्थानिकांशी चर्चा, त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणे, त्यांचे आक्षेप, अडचणी समजून घेणे यापैकी काहीही झालेले नाही. तीन ते चार दशकांपूर्वी वर्सोवा किनाऱ्यावरील इमारतींमध्ये लाटांचे पाणी शिरण्यास प्रारंभ झाला होता, त्यावेळी किनाऱ्यावर दगड आणून टाकण्यात आले होते. त्यानंतर पाणी इमारतींमध्ये शिरण्याचा त्रास कमी झाला होता. मात्र आता ऐन वाळूतच भिंत वाधण्यात येत असल्याने वर्सोव्याचे वैभव असलेला समुद्र किनाराच उरणार नाही, ही भीती त्यांना सतावू लागली आहे. किनाऱ्यावर सिमेंट-काँक्रिटची भिंत उभारली तर पाण्याला पसरण्यासाठी कमी जागा उरेल. हे पाणी सातत्याने किनाऱ्यावरील वाळूची धूप करेल आणि वर्सोव्याचा वाळूचा किनारा नष्ट होण्यासाठी फार काळ लागणार नाही, असा इशारा स्थानिक कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके त्यांनी दिला. समुद्रात सातत्याने होणाऱ्या भरावांमुळे समुद्राचे पाणी आपल्या वाटा दुसरीकडे शोधते. कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी-लिंक या दोन्हींचे परिणाम वर्सोव्याच्या खाडीवर झाल्याचे स्थानिक मच्छिमार सांगतात. या भरावांमुळे खाड्या गाळाने भरत आहेत. पूर्वी मालाडच्या मीठबंदरपर्यंत मोठी जहाजे यायची, तिथे आता वर्सोव्याच्या खाडीमध्ये मच्छिमारांच्या लहान होड्या येण्यासाठीही मोठ्या भरतीची वाट पाहायला लागते, इतका गाळ आणि वाळू खाड्यांमध्ये भरली आहे, असेही राजहंस टपके यांनी सांगितले. पूर्वी वर्सोवा किनाऱ्यावर खेकडे मिळायचे, मात्र आता या किनाऱ्यावरील जैवविविधता नष्ट झाली आहे. पर्यावरणीय आघातांचे दुष्परिणाम विचारात न घेता तात्पुरती मलमपट्टी करणारे पर्याय शोधून त्यासाठी निधी खर्च केला जातो, याकडे स्थानिक लक्ष वेधतात. भिंतीला आक्षेप - सध्या बांधण्यात येणारी भिंत ही थेट वाळूमध्ये, इमारतींच्या कुंपणापासून ३० फूट अंतरावर. - या दोन्हीमध्ये जॉगिंग ट्रॅक बनवला जात आहे. - काही ठिकाणी टेट्रापॉड्सही टाकण्यात आले आहेत. - स्थानिकांशी चर्चा, प्रक्रियेत सामावून घेणे, अडचणी समजून घेणे यापैकी काहीही झालेले नाही. मच्छिमार समाज सातत्याने किनारे, समुद्रातील जैवविविधतेच्या नुकसानाकडे आणि समुद्रात त्याच्या उमटणाऱ्या पडसादांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विकासाच्या नावाखाली याकडे दुर्लक्ष केले जात आहे. - राजहंस टपके, सरचिटणीस, स्थानिक कोळी महासंघ


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3joTrFZ

No comments:

Post a Comment