म. टा. विशेष प्रतिनिधी, 'राज्यात करोनाचे संकट समोर असताना आरोग्याच्या सोयी-सुविधा निर्माण करण्याऐवजी काही जणांना यात्रा काढायच्या आहेत. अशा प्रकारे नागरिकांचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करणे दुर्दैवी आहे. हे काही स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केलेले आंदोलन नाही,' असा सणसणीत टोला यांनी मंगळवारी भाजपला लगावला. 'राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही सणाच्या नव्हे, तर करोनाच्या विरोधात आहे. करोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही. त्याला रोखण्यासाठी नियमांचे पालन करावेच लागेल,' असे स्पष्ट करताना उत्सव कालावधीत संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्रानेच राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितल्याची आठवणही त्यांनी विरोधकांना करून दिली. ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्यउत्सव आयोजित करण्याचे निश्चित केले. त्याचाच भाग म्हणून आमदार प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे दोन ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले. यापैकी ठाण्यातील दुसऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी जन आशीर्वाद यात्रा आणि मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या भाजपला त्यांनी लक्ष्य केले. या कार्यक्रमाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. उत्साह, उत्सवाला मुकल्याची जाणीव 'दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत, याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते. पण, आज गर्दी करून उत्सव साजरा करण्यासारखी परिस्थिती नाही. करोनाचे संकट जगभर पसरले आहे. आज प्रताप सरनाईक करोनाविरोधात जे आंदोलन करीत आहेत, तसे करण्याची गरज आहे. पण, दुर्दैवाने तेवढी प्रगल्भता इतर काहींमध्ये दिसत नाही. आपल्या बेशिस्त वागणुकीतून ते शिस्त पाळणाऱ्यांचे जीवनही अडचणीत आणत आहेत,' अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे म्हणाले - करोनाचे संकट समोर असताना काहींना यात्रा काढायच्या आहेत - नागरिकांचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करणे दुर्दैवी - हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही - करोना रोखण्यासाठी नियमांचे पालन करावेच लागेल - केंद्रानेच राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/38rY5Ov
No comments:
Post a Comment