म. टा. विशेष प्रतिनिधी, 'लैंगिक भावनेच्या हेतूविना लहान मुलीच्या गालांना केलेला स्पर्श हा पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा होत नाही,' असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने एक वर्षापासून गजाआड असलेल्या ४६ वर्षीय आरोपीला नुकताच जामीन मंजूर केला. आठ वर्षीय मुलीच्या आईच्या तक्रारीवरून ठाण्यातील राबोडी पोलिसांनी महंमद अहमद उल्ला याच्याविरोधात भारतीय दंड संहिता व पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली २९ जुलै २०२० रोजी गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हापासून तो नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात आहे. 'मांस विक्रेता असलेल्या आरोपीने मुलीला त्याच्या दुकानात बोलावले. तिच्या गालांना स्पर्श केला आणि नंतर त्याने त्याचा शर्ट काढला. तो पँट काढण्याच्या बेतात असतानाच मुलीच्या आईला संशय आल्याने तिने तिथे धाव घेतली,' असे तक्रारीत म्हटले होते. मात्र, व्यवसायात अनेक स्पर्धक असल्याने मला खोट्या गुन्ह्यात अडकवले, असा आरोपीचा दावा होता. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने अॅड. रामप्रसाद गुप्ता यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अर्ज केला होता. 'पोक्सो कायद्यातील कलम ७ अन्वये एखाद्याने लहान मुलगा किंवा मुलीच्या शरीराच्या गुप्त भागाला लैंगिक हेतूने स्पर्श केला किंवा लहान मुलगा वा मुलीला एखाद्याच्या शरीराच्या गुप्त भागाला स्पर्श करायला लावल्यास संबंधित कृती गुन्हा ठरते. या प्रकरणातील पुरावे लक्षात घेता आरोपीने पीडित मुलीच्या गालांना लैंगिक हेतूने स्पर्श केल्याचे दिसत नसल्याने गुन्हा होत नाही,' असे निरीक्षण न्या. संदीप शिंदे यांनी निर्णयात नोंदवले. हे निरीक्षण केवळ जामीन अर्जापुरते असून, त्याने खटल्यातील सुनावणीत न्यायालयाने प्रभावित होऊ नये, असेही न्यायमूर्तींनी आदेशात स्पष्ट केले. न्यायालयाने आरोपी उल्ला याला २५ हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि तेवढ्याच रकमेच्या एक किंवा दोन हमीदारांच्या अटीवर जामीन मंजूर केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jp2yaY
No comments:
Post a Comment