Breaking

Monday, September 27, 2021

बर्थ-डे स्पेशलः नकलाकार लता दिदींची अशी ही बाजू https://ift.tt/2Wip64l

पुरुषोत्तम बेर्डे दीदी आल्या तेव्हा '' होत्या. नंतर त्या आमच्या बरोबरीच्या झाल्या. जाताना त्या लतादीदी होऊनच गेल्या. दोन तासांच्या भेटीत 'मोगरा फुलला... फुले वेचिता बहरू कळियासी आला', अशी आमची अवस्था झाली. श्रावणात घननीळा बरसला, रिमझिम रेशीम धारा, उलगडला झाडातून अवचित हिरवा मोर पिसारा... मंगेश पाडगावकरांची कविता, खळेसाहेबांचे संगीत आणि लतादीदींचा स्वर, या त्रिवेणी संगमाने तयार झालेले हे एक अजरामर गीत दर वर्षी पावसाळ्यात हमखास आठवते. त्यासाठी हिरव्यागर्द कोकणातच असायला हवे, असे नाही. मुंबईच्या भर ट्रॅफिकमध्ये, किंवा मराठवाडा, विदर्भातल्या मे महिन्याच्या उन्हाळ्यातही पावसाच्या हलक्या सरी अंगावर पडल्याचा आभास निर्माण करण्याची ताकद या गाण्यात आहे. या शब्दमोगऱ्याच्या गुच्छातून जेव्हा लतादीदींच्या स्वरांचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा बेहोश प्रसन्न अवस्था हे एकच वर्णन लागू पडते. ही बेहोश प्रसन्न अवस्था मी आणि लक्ष्मीकांतने १९८७च्या मे महिन्यात अनुभवली. लता मंगेशकर या नावातच अनेक 'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे' पसरलेले आहेत. त्यांच्या स्वरांच्या लहरींनी संपूर्ण वातावरण व्यापून राहिले आहे. एखाद्या परग्रहावर पुढेमागे इथल्या ध्वनिलहरी पोहोचल्या, तर त्या ग्रहण करणाऱ्याला पहिला स्वर भावेल तो लतादीदींचाच. अशा लतादीदींची साऱ्या जगाने शेकडो गाणी ऐकली. त्याच दीदींबरोबर एखाद्या दिवाळी अंकासाठी हलक्याफुलक्या मुलाखतवजा गप्पा मारण्याची संधी बहुतेक प्रथमच मला आणि लक्षाला मिळाली असावी. लक्ष्मीकांतचा शाळा-कॉलेजातला मित्र आणि कवी, साहित्यप्रेमी रवींद्र धोत्रे याला एक विनोदी दिवाळी अंक काढायचा होता. त्याचे संपादक म्हणून त्याने लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे नाव दिले. दिवाळी अंकाचे नाव होते 'भेळ'. त्याचे मुखपृष्ठ व सजावट मी केली होती. लतादीदी जितक्या महान गायिका; तितक्याच त्या उत्तम नकलाकार आहेत, असे नेहमी ऐकत आलो. त्या दिवाळी अंकांचा खरा संपादक असलेल्या रवींद्र धोत्रेने, अनेक साहित्यिकांना विनोदी लेखन करण्यासाठी आमंत्रित केले. त्यात एक आगळीवेगळी विनोदी मुलाखत छापून यावी, ही महत्त्वाकांक्षी योजना मनात आखली. ती म्हणजे, प्रत्यक्ष गानसरस्वती लता मंगेशकर यांची मुलाखत मी आणि लक्ष्मीकांत बेर्डेने घ्यावी, तीही विनोदी. ही जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट होती. यालाच तर महत्त्वाकांक्षा म्हणतात. रवी धोत्रेने त्याचा मित्र, मराठी चित्रपटांचा पटकथाकार सुधीर नांदोडे याला सांगितले. त्यांच्या काही चित्रपटांचे संगीत अनिल मोहिले यांनी केले होते. त्यांनी अनिल मोहिलेंना ही कल्पना सांगितली. त्यांना ती आवडली. अनिल मोहिले हे लतादीदींच्या खास गोटातले. त्यांनी ही कल्पना दीदींच्या कानावर घातली. लतादीदींनाही ती आवडली असावी. ताडदेवच्या शशांक लालचंद यांच्या एस. एल. स्टुडिओमध्ये ही मुलाखत आयोजित केली गेली. सकाळी अकाराची वेळ ठरली. अनिल मोहिलेंनी ताकीद देऊन ठेवली होती, दीदी वेळेच्या पक्क्या आहेत. बरोबर वेळेत येतील आणि कोणी आलेले नाही, हे बघून निघूनही जातील. वेळ पाळा. अर्थात, आम्ही सगळे १५ मिनिटे आधीच पोचलो. साक्षात लतादीदींशी बोलायचे, तेही मुलाखतीच्या स्वरूपात. त्यांच्यातल्या गायिकेशी नव्हे, तर नकलाकाराशी! वाट बघण्याच्या पंधरा मिनिटांत घाम फुटणे, येरझाऱ्या घालणे, उगाचच धडपडणे वगैरे सुरू होते. तेवढ्यात लतादीदींची पांढरी शुभ्र फियाट स्टुडिओच्या दारात आली आणि घड्याळात त्यानंतर अकरा वाजले. मी आणि लक्षा त्यांना सामोरे गेलो. 'मला फार उशीर नाही ना झाला,' दीदींनी प्रश्न विचारला. आम्ही, 'नाही, नाही' असे म्हणून त्यांना नमस्काराचे हात जोडले. साक्षात सरस्वतीने वीणा छेडावी तशा आवाजात दीदींनी प्रश्न विचारला आणि तंबोऱ्याची तार तुटावी तशा आवाजात आम्ही उत्तर दिले. नंतर सगळा धीर एकवटून लक्ष्मीकांतने 'भेळ'विषयी सांगितले. विनोदी दिवाळी अंक व नंतर पाक्षिक वगैरे. त्यावर 'अच्छा, म्हणजे मी आता संगीताच्या 'भेळ'विषयी बोलू का,' असे म्हणून त्या खळाळून हसल्या, तेव्हा सोन्याच्या वाटीत चांदीच्या मोहरा ओतल्यासारखे वाटले. त्याच्यापुढे मग आमच्या हास्याचा गडगडाट, पिंपात दगड पडावेत तसा! 'हो, अलीकडच्या संगीताच्या 'भेळे'विषयी काही किस्से सांगू शकाल का?' लक्ष्मीकांतने कडक हेडमास्तरांना 'वर्गात येऊ का?' विचारावे तसा प्रश्न केला. 'अलीकडे मी खूप कमी केलंय गायचं; त्यामुळे हल्ली जी संगीताची भेळ सुरू आहे, त्याविषयी मला विशेष माहिती नाही; पण हल्ली फारसं काही चांगलं ऐकायला मिळत नाही एवढं मात्र खरं...' चला, पहिल्या प्रश्नात उत्तर मिळाले. मग लक्ष्मीकांत सरसावला. त्याने दुसरा प्रश्न विचारला, 'हो, तेही खरंच. पूर्वीची गाणी आजही इतकी लोकप्रिय आहेत, की नवीन कॅसेट घेण्यापेक्षा जुन्या रेकॉर्ड ऐकण्यातच बऱ्याच लोकांना धन्यता वाटते.' लक्षाने वाक्य पुरे केले आणि पाणी प्याला. भल्याभल्यांना हसवून सोडणारा लक्षा अगदी दोन फुटांवर असलेल्या दीदींच्या प्रचंड दबावाखाली होता. त्याच्याही खाली मी होतो. तुम्हीही विचार करा, समजायला लागल्यापासून ज्यांची गाणी ऐकतो आहोत, त्या लता मंगेशकर समोर आहेत. प्रत्यक्ष आपल्याशी बोलत आहेत, हे वास्तव सहन करण्याची अवस्था यायला जरा वेळ लागला. दीदींच्या हे लक्षात आले असावे. त्याच आमच्या मदतीला धावून आल्या. 'हो ना, तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे,' दीदींनी आम्हाला आहो-जाहो म्हणणे, म्हणजे मर्सिडिझने सायकलला साइड देण्यासारखे होते. 'परवाच मी चर्चगेटला एका व्हिडिओ कॅसेटच्या शोरूममध्ये गेले होते. तिथे एक माणूस खरेदीसाठी आला होता. मला बघून जरा मोठ्यानेच कोकलला, 'काय ते आजकालचे सिनेमे, काय ती गाणी, नुसत्या मारामाऱ्या.' नंतर त्याला थोडंसं खजील झाल्यासारखं वाटलं असावं. मी ऐकतेय हे कळल्यावर जवळ आला. 'लताजी, आपका क्या खयाल हैं, आजकलके गानोंके बारेमें? आप तो सुवर्णयुग की साक्षीदार हैं.' मी म्हटलं, 'बाबा रे, मी काय सांगू? मीच आजकाल गाणं कमी केलंय.' मीही त्याच्या बाजूची आहे म्हटल्यावर, तो आणखी मीठ-मसाला लावून आजच्या संगीतावर टीका करू लागला. चुकून त्याने मी गायलेल्या एक-दोन सिनेमांचाही उल्लेख केला. नंतर वरमला. म्हणाला, 'नहीं, नही. उस फिल्म में आपने बहुत खूबसूरत गाने गाये हैं.' असे म्हणून त्या अगदी पूर्ण एक्स्प्रेशनसहीत त्याची नक्कल करून, त्याची फजिती सांगत होत्या. त्यांच्या या लांबलचक आठवणीमुळे आम्हा दोघांनाही जरा जोर चढला. महालक्ष्मीच्या जत्रेत लहान मुलाला एक खेळणे घेऊन दिले, की तो दुसरे मागतो, तसे आता आम्ही भीड सुटल्यासारखे बोलू लागलो. 'म्हणजे दीदी, तुम्ही आता गाणं स्वीकारण्याच्या आधी शब्द काय आहेत, हे कठोर होऊन तपासता का?' 'हो ना, नक्कीच; पण तरीही कधी चांगल्या संगीतकारांच्या आग्रहाखातर म्हणा किंवा जुन्या मित्रांसाठी तडजोड करतेच. उदाहरणार्थ, मागे एकदा राजूच्या (म्हणजे राजेश रोशन) एक गाण्यासाठी स्टुडिओवर गेले. तिकडे गेल्यावर माझ्या हातात गाण्याचे शब्द आले. हल्ली असंच होतं. पूर्वीसारखे आधी शब्द हातात पडत नाहीत. आयत्या वेळेला हातात पडतात आणि मग चेहराही पडतो. राजूने दिलेले ते शब्द विचित्र होते. काय तर म्हणे, 'अंग्रेजी में कहते हैं की आई लव्ह यू.' म्हटलं, अरे बाबा हे काय गाणं आहे का? आता त्याचा चेहरा पडला. त्या पडेल चेहऱ्यानं त्यानं विनंती केली, 'दीदी, अगर आप ये गाना नही गाओगे, तो ये पिक्चर मेरे हातसे चली जाएगी.' झालं... मग नाईलाज म्हणून आणि त्याच्या हातून सिनेमा जाऊ नये, म्हणून मग ते गाणं मी गायले.' पडेल चेहऱ्याने विनंती केल्यावर दीदींनी गाणे म्हटले आणि पुढे ते हिटही झाले. तसेच दोन पडेल चेहऱ्यांसमोर दीदींनी बोलायला सुरुवात केली आणि ते दोन्ही चेहरे आता उत्साहाने बोलते झाले होते. वातावरण थोडे हलके झाले. गॅसच्या फुग्याने वर जाऊन, एअर इंडियाच्या विमानाला 'हॅलो' म्हणावे, तसे आमचे प्रश्न सुरू होते. 'दीदी, आपण नकला खूप छान करता, असं आम्ही ऐकलंय. एवढ्या व्यग्र दिनक्रमात नकलांची कला कशी जोपासलीत?' दीदींचा कल बघून मी नकलांचा विषय काढला. 'छे हो, मी काही उठसूट कोणाच्याही नकला करीत नाही. घरात सगळे गप्पा मारायला बसलो, की एखादा प्रसंग रंगवून सांगताना साभिनय करून दाखवायची सवय आहे, तेवढंच.' खरे तर दीदींनी जे दोन-चार किस्से सांगितले, ते साभिनयच सांगितले होते, हे विसरून गेलो होतो. 'दीदी, कधी कुणाची फिरकी घेण्याचा मोह होतो का तुम्हाला?' मी थोडा खाली घसरून नाक्यावरचा प्रश्न विचारला. 'हो, होतो ना; पण समोरच्याला कळू न देण्याची काळजी घेते. आता हेच बघा ना, कदाचित मगापासून मी तुमची फिरकीच घेत असेन.' यावर आम्ही सगळे विविध प्रकारच्या आनंदाने जे हसलो, त्याला 'उपमा' फक्त उडप्याच्या हॉटेलात मिळेल. माझ्या पडलेल्या विकेटचा आनंद लक्ष्मीकांतच्या चेहऱ्यावर दिसत होता. 'दीदी, आपण नाटकं पाहता का?' 'नाही. मी नाटकं पाहत नाही.' 'म्हणजे, वेळ नाही की नाटकांची आवड नाही?' 'नाही नाही, आवड आहे आणि वेळही आहे; पण मला तुमची आजकालची नाटकं आवडत नाहीत,' आम्हाला दोघांनाही दीदींनी एकत्र रनआउट केले. 'म्हणजे मला संगीत नाटकं जास्त आवडतात किंवा फार्सिकल.' आता लक्ष्याच्या जीवात जीव आला. 'मग कधी तरी आमच्या नाटकाला या. तुम्हाला हसवण्याची गॅरेंटी आमची.' त्यातल्या त्यात आम्ही आमच्या नाटकाची जाहिरात केली. 'दीदी, आपण खूप पूर्वी नाटकात कामही केलं होतं ना? मग नंतर का थांबवलंत?' 'अहो, बाबांच्याच एक नाटकात मी छोट्या राजकन्येच्या भूमिकेत काम केलं. त्यात झोपायचा सीन होता. मी जी झोपले, ती उठलेच नाही. शेवटी पडदा पाडावा लागला. त्यानंतर एका संगीत पौराणिक नाटकामध्ये काम केलं. त्यात राजा गोसावी, भालचंद्र पेंढारकर अशी मंडळी होती. मला एक वाक्य होतं, 'महाराज, मी तुमच्या पायावर डोकं ठेवते; पण मला वाचवा.' भर नाटकात मी ब्लँक झाले आणि 'महाराज, मी तुमच्या डोक्यावर पाय ठेवते; पण मला वाचवा,' असं म्हणाले आणि प्रेक्षागृहातलीच नव्हे, तर स्टेजवरचीही सर्व मंडळी प्रचंड हसली. इतकी, की पडदा पाडावा लागला. त्यानंतर माझं पार्श्वगायन सुरू झालं आणि नाटक या प्रकारावर माझ्याकडून पडदा पडला.' 'दीदी, आनंदघन सध्या शांत का आहे?' खरं तर आमच्या पुढच्या सिनेमाला संगीत द्याल का, असे विचारण्याऐवजी मी हा प्रश्न विचारला. म्हणजे मुख्यमंत्र्याला एखाद्या नवोदित आमदाराने, 'मला गृहखाते मिळेल का,' असे विचारण्यासारखे होते. 'अहो, 'साधी माणसं' या चित्रपटाला उत्कृष्ट संगीत दिल्याबद्दल 'आनंदघन'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तो मी स्वीकारल्यानंतर सर्वांना कळलं, की मीच आहे 'आनंदघन'. त्यानंतर माझ्या संगीत दिग्दर्शनाच्या पुढच्या चित्रपटाला पत्रकारांनी असं झोडपलं, की विचारू नका. मग मीच नाराज होऊन संगीत देणं बंद केलं.' पत्रकार फक्त आम्हालाच झोडतात असे नाही. त्यांनी लता मंगेशकरांनाही सोडले नाही, हे बघून आम्हाला हुरूप आला. त्यानंतर खूप छान गप्पा रंगल्या. दीदींनी आमच्यातले अंतर एकदम कमी करून अनेक किस्से सांगितले. ते सांगताना रफी साहेब, किशोरदा, आशाताई यांच्या नकलांसकट. ते पाहायचे भाग्य आम्हाला मिळाले. दीदींचे आभार मानताना मी म्हटले, 'दीदी, वेळ कसा गेला कळलेच नाही.' 'हो ना, मागे एकदा भरपूर गप्पा मारून झाल्यावर शांताबाई शेळके आमच्या घरून निघताना हेच म्हणाल्या होत्या. मी त्यांना म्हटलं, 'चला कोणाबरोबर तरी गेला ना? बरं झालं...' मग पुन्हा आम्ही खळाळून हसलो. दीदींनी शांताबाईंच्या खांद्यावरून एका गोळीत दोन पक्षी मारले. अत्यंत सुहास्य वदनाने दीदींना निरोप दिला. दीदी आल्या तेव्हा 'लता मंगेशकर' होत्या. नंतर त्या आमच्या बरोबरीच्या झाल्या. जाताना त्या लतादीदी होऊनच गेल्या. दोन तासांच्या भेटीत 'मोगरा फुलला... फुले वेचिता बहरू कळियासी आला', अशी आमची अवस्था झाली. येत्या २८ तारखेला दीदी ९३व्या वर्षात पदार्पण करत आहेत. ३४ वर्षांपूर्वी त्यांच्याशी झालेली ही भेट, म्हणजे आमच्या आयुष्यातील 'विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले' इतकी देदीप्यमान होती. त्यांच्या दिव्य स्वरांच्या हिरवाईने आमचे जीवन समृद्ध केले. त्या बदल्यात त्यांना उत्तम आरोग्य लाभो, या भरघोस शुभेच्छा देण्यापलीकडे आपण काय देऊ शकतो?


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lZc7NQ

No comments:

Post a Comment