म. टा. प्रतिनिधी, मुंबईः घटस्थापनेपासून सर्व धार्मिक स्थळे खुली होणार असली तरी रेल्वे पॅसेंजर सेवेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यांतर्गत धावणाऱ्या प्रवासी गाड्या सुरू करण्याबाबत केंद्राने राज्याकडे बोट दाखवले आहे. राज्य सरकारकडून स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना योग्य निर्णय घेण्याच्या सूचना आहेत. मात्र प्रत्येक जिल्हानिहाय करोना स्थिती वेगळी असल्याने पॅसेंजर गाड्यांबाबत एकच नियमांची गरज जिल्हाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. एसटी ही राज्याची जीवनवाहिनी असली तरी राज्य परिवहन ताफ्यातील गाड्यांची स्थिती पाहता जादा गाड्या सोडण्याची शक्यता कमीच आहे. जवळपास सर्वच धार्मिक स्थळांना रेल्वेची जोडणी असल्याने रेल्वेचाच किंबहुना पॅसेंजर गाड्यांचा मोठा आधार भाविक-प्रवाशांना असणार आहे. करोनामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मिळून एकूण १००हून अधिक पॅसेंजर गाड्या सध्या बंद आहेत. करोना काळात केंद्र सरकारने विशेष भारासह मेल-एक्स्प्रेस सुरू केल्या. मात्र लोकल, मेमू, पॅसेंजरबाबतचा निर्णय राज्य सरकारवर सोपवला. मुंबई महानगर क्षेत्र विशेष बाब म्हणून सरकारने प्रवासी निर्बंधांसह लोकल आणि मेमूला मुभा दिली. मात्र पॅसेंजरबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. नवरात्रोत्सवात प्रवास मागणी वाढण्याची शक्यता असल्याने काही प्रमाणात पॅसेंजर सेवा सुरू करण्यासाठी रेल्वेची तयारी आहे. याबाबत राज्य सरकारशी बोलणी सुरू असून लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. ही आहे अडचण... अत्यावश्यक, लसधारकांना लोकलमुभा आणि लस न घेतलेल्यांवर लोकलबंदी असे प्रवासी वर्गीकरण लोकल आणि मेमूमध्ये आहे. मात्र पॅसेंजर सुरू केल्यास त्यात नेमक्या कोणत्या प्रवाशांना मुभा द्यायची, हा प्रश्न आहे. पॅसेंजर अनेक जिल्ह्यांतून धावते. जिल्हानिहाय करोना स्थितीत आजही निरनिराळी आहे. यामुळे पॅसेंजर गाड्यांसाठी एकच नियमावली असावी आणि तो निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे मत एका जिल्हाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2ZDE0Dz
No comments:
Post a Comment