Breaking

Wednesday, September 29, 2021

मुंबईकरांना कोळशावरील विद्युतप्रकल्पामुळे धोका; नेमकं कारण काय? https://ift.tt/3il8iBt

'सी ४० सिटीज'चा इशारा म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मुंबईपासून सुमारे ५०० किलोमीटरवर असलेल्या कोळशावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पांमुळेही मुंबईकरांच्या आरोग्याला धोका आहे. जगभरातील प्रदूषण कमी करण्यासाठी बांधील असलेल्या शहरांच्या 'सी ४० सिटीज' या मोहिमेदरम्यान झालेल्या संशोधनामध्ये हा मुद्दा समोर आला आहे. मुंबई या मोहिमेचा एक भाग आहे. यासंदर्भातील संशोधन बुधवारी प्रकाशित झाले. कोळशावर चालणाऱ्या विद्युतप्रकल्पामुळे मुंबईकरांच्या आरोग्यासोबतच आर्थिक घातक परिणामांचाही सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. जगातील इतर मोठ्या शहरांना अशाप्रकारच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या धोक्यांच्या तुलनेत मुंबईला अधिक धोका आहे, असे संशोधनात समोर आले आहे. सध्या सुरू असलेल्या दशकात मुंबईत सहा हजार २०० अकाली मृत्यू आणि तीन हजार २०० मुदतपूर्व जन्म होण्याची शक्यता आहे वर्तवण्यात आली आहे. तसेच श्वसनासंबंधी आजारांसाठी चार हजारांहून अधिक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते. या सर्वांमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढू शकतो. यातून रजांचे दिवस आणि त्या अनुषंगाने आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. देशभरातील कोळसाधारित विद्युतनिर्मिती प्रकल्पांपैकी नऊ टक्के प्रकल्प मुंबईपासून ५०० किलोमीटर अंतरावर आहेत. कोळसा जाळून होणाऱ्या विद्युतनिर्मितीदरम्यान निर्माण होणारी प्रदूषके शेकडो किलोमीटर दूर जाऊ शकतात. मुंबईतील हवा प्रदूषणाची (पीएम २.५) पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा तिपटीने अधिक आहे. कोळसाधारित विद्युतनिर्मिती प्रकल्पांच्या सध्याच्या राष्ट्रीय योजनांनुसार सन २०२० ते २०३० या कालावधीमध्ये घट होण्याऐवजी २८ टक्क्यांनी वाढ होणार आहे. यामुळे भारताचे पर्यावरण आणि हवेच्या गुणवत्तेचा स्तर राखण्याच्या उद्देशांवर परिणाम होणार आहे. या कोळसाधारित विद्युतनिर्मितीतून होणाऱ्या प्रदूषणामुळे मुंबईत वर्षाला अकाली मृत्यूंचे प्रमाण ३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती 'सी ४० सिटीज'चे माहिती व संशोधन विभागप्रमुख डॉ. रेचेल हक्स्ले यांनी दिली. मुंबईच्या वातावरणात हरितगृह वायूउत्सर्जनासाठी प्रामुख्याने वीज हा घटक कारणीभूत आहे. याचे प्रमाण ७१ टक्के आहे. मुंबईला पुरवली जाणारी ९५ टक्के वीज ही कोळशाच्या माध्यमातून तयार होते. निवासी घटकांकडून वापरल्या जाणाऱ्या विजेमुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन ५५ टक्के होते. या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारने स्वच्छ ऊर्जेमध्ये गुंतवणूक करतानाच कोळशाशी संबंधित विद्युत निर्मिती प्रकल्प लवकरच बंद करण्याचा विचार करण्याची गरज या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. येत्या काळात अक्षय्य ऊर्जेच्या प्रकल्पांमध्ये वाढ करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/39QDNyI

No comments:

Post a Comment