Breaking

Wednesday, September 29, 2021

मुंबईकरांचा मेट्रो प्रवास लांबणीवर?; अधिकारी म्हणाले https://ift.tt/2Zy42YP

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: वातानुकूलित आणि वेगवान मेट्रो प्रवास विस्ताराचे स्वप्न पाहणाऱ्या तमाम मुंबईकरांना तूर्त प्रतीक्षाच करावी लागणार आहे. स्थानकांची अपूर्ण बांधकामे, सिग्नल यंत्रणेचे सुरू असलेले काम आणि चाचणीशिवाय येणाऱ्या मेट्रो गाड्या यांमुळे दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो २ अ आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो ७ यांवर पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी आणखी नऊ महिने लागणार आहेत. 'मेट्रोचा विस्तार लांबणीवर पडण्यासाठी करोना काळासह मोठ्या प्रमाणातील अपूर्ण बांधकाम, गाड्यांची बांधणी, गाड्यांची चाचणी अशी सर्वच कारणे आहेत. मुळात हा प्रकल्प डिसेंबर २०१९ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होता. चालकविरहित मेट्रो ही नवी संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. यासाठी आधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रत्येक गाड्यांची चाचणी गरजेची आहे,'असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी 'मटा'ला सांगितले. बेंगळूरू येथे ११ मेट्रो गाड्यांची बांधणी होत आहे. यापैकी तीन गाड्या या मुंबईत दाखल झाल्या असून, उर्वरित गाड्या डिसेंबर-जानेवारीमध्ये येतील. ट्रेन मॅनेजमेंट सिस्टिम (टीएमएस) आणि कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) या सॉफ्टवेअरने सर्व गाड्यांची मुंबईत चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी पूर्ण झाल्यानंतर रिसर्च डिझाइन अँड स्टॅन्डर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) आणि कमिशन ऑफ मेट्रोरेल सेफ्टी (सीएमआरएस) यांच्याकडून १५ दिवसांची तपासणी होते. त्यांच्या परवानगीनंतर प्रवासी वाहतुकीसाठी मेट्रो उपलब्ध होईल. या प्रक्रियेला सहा महिन्यांचा काळ अपेक्षित असतो. मेट्रो स्थानकांसह सरकते जिने, लिफ्ट, पायऱ्या यांचे काम बाकी आहे. त्यानंतर फसाड उभारण्यात येईल. काही स्थानकांचा केवळ ढाचा तयार आहे. दरम्यान, ही कामे असताना मेट्रोची चाचणीही समांतर सुरू आहे. मेट्रो चाचणी करत असताना, स्थानकांची कामे करता येत नाही. कामगारांची सुरक्षा लक्षात घेता तीन दिवस बांधकाम आणि चार दिवस मेट्रो चाचणी असे नियोजन करण्यात आले असून, दिवस-रात्र अथक कामे सुरू आहेत. येत्या तीन-चार महिन्यात अंशत: मेट्रो सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मेट्रो २ अ आणि ७ मधील स्थानकांची बांधकामे मोठ्या प्रमाणात बाकी आहेत. ही कामे सुरू असतानाच मेट्रो चाचणी होत आहे. यामुळे 'डेडलाइन' देणे योग्य राहणार नाही. मात्र, मेट्रो पूर्ण क्षमतेने धावण्यासाठी नऊ महिन्यांचा काळ अपेक्षित आहे. - एस. व्ही. आर. श्रीनिवास, आयुक्त, एमएमआरडीए सात वर्षांनीही प्रवास खडतरच मुंबईतील पहिली मेट्रो सन २०१४मध्ये वर्सोवा-घाटकोपर मार्गावर सुरू झाली होती. यानंतर सात वर्षांनीही तिचा विस्तार अर्थात दुसरी मेट्रो सुरू होऊ शकलेली नाही. यामुळे स्वस्त, वेगवान प्रवासासाठी मुंबईकर रेल्वेवरच अवंलबून आहेत. रस्त्यांवरील खड्डे, कोंडी, बसची प्रचंड मर्यादा असल्याने यामुळे मुंबईकरांचा प्रवास खडतरच आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3D1PQFQ

No comments:

Post a Comment