Breaking

Wednesday, September 29, 2021

अतिवृष्टीने शेतकरी संकटात! मराठवाड्यात २२ लाख हेक्टर शेतजमिनीचे नुकसान https://ift.tt/3ohqcJ9

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्यभरात सुमारे २२ लाख हेक्टर शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी महापुरामुळे जमिनी खरडून गेल्या असून, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कोल्हापूर बंधारे फुटले आहेत. नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी केंद्राकडे अनेक प्रस्ताव यापूर्वी पाठवण्यात आले; पण केंद्राकडून पुरेशा प्रमाणात मदत दिली जात नाही, असा आरोप मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी पुन्हा केला आहे. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे ४३६ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच वीज अंगावर पडून १९६ जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे राज्यात शेती, उभ्या पिकांचे, खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. शेतीसाठी उपयुक्त आणि दुभती जनावरे वाहून गेल्याच्या आणि जनावरांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. मराठवाड्यासह एकूण १०पैकी सात जिल्ह्यांमध्ये १८० टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली. मराठवाड्यात ४५२ पैकी ३८१ महसूल क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून, त्यातील १२७ क्षेत्रात चार वेळेस, तर काही ठिकाणी आठ वेळेस अतिवृष्टी झाल्याचे त्यांनी सांगितले. 'तौक्ते'ची मदत अद्याप नाही नैसर्गिक आपत्तीत संबंधित घटकांना रास्त भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे अनेकवेळा प्रस्ताव पाठविले आहेत. तौक्ते चक्रीवादळाची मदत अद्याप मिळालेली नाही. राज्य मंत्रिमंडळाची मुंबईतील बैठक आटोपल्यानंतर बहुतांश पालकमंत्री मराठवाड्यात दाखल झाले असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज येऊ शकेल, असे ते म्हणाले. आतापर्यंत याआधीच्या नुकसानीचे ८१ टक्के पंचनामे झाले आहेत. ओल्या दुष्काळाबाबत निर्णय घेणार मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि अन्य नुकसानाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत याबाबत चर्चा होईल. मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असून, त्याबाबतचा निर्णय आगामी मंत्रिमंडळ बैठकीत होऊ शकतो, असे संकेत वडेट्टीवार यांनी दिले आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kVqJyg

No comments:

Post a Comment