म. टा. प्रतिनिधी, मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) परीक्षार्थींना लोकलमुभा देण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने जाहीर केला. याबाबतची माहिती भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी ट्विट करून दिली. शनिवार, ४ सप्टेंबर रोजी एमपीएससीची परीक्षा आहे. गुरुवारी रात्री उशिरा परीक्षार्थींना प्रवासमुभा देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठवल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकातील खिडक्यांवर हॉलतिकीट दाखवून तिकीट मिळवता येईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. एमपीएससी परीक्षेसाठी उपनगरांतील विद्यार्थ्यांना रेल्वेप्रवासाची परवानगी मिळण्याबाबतची विनंती काही विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे ही मागणी केली. हॉलतिकीट पाहून रेल्वे तिकीट देता येईल, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र यासाठी राज्य सरकारचा प्रस्ताव येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबाबत कळवताच त्यांनी रेल्वेशी संपर्क केल्यास लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल असे स्पष्ट केले, अशी माहिती शेलार यांनी ट्विट करून दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3jHxm6I
No comments:
Post a Comment