Breaking

Saturday, November 20, 2021

बँक व्यवस्थापकाने केला ६३ लाखांचा अपहार; अशी केली अफरातफर https://ift.tt/3CxxTyl

एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या वडाळा येथील शाखेतील वरिष्ठ व्यवस्थापकाने पदाचा गैरवापर करून तब्बल ६३ लाखांची अफरातफर केल्याचा प्रकार समोर आला आहे. बँकेतील काही खातेदारांच्या खात्यांचा वापर करून, त्या खात्यांची पैसे काढण्याची मर्यादा वाढवून या व्यवस्थापकाने त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करून नंतर ती स्वतःच्या आणि पत्नीच्या खात्यावर वळविल्याचे उघड झाले आहे. बँकेचे नाव, कर्मचाऱ्यांकडून मिळणारी सेवा आणि विश्वासार्हता पाहूनच खातेदारांकडून बँकेची निवड केली जाते. परंतु या प्रकरणात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडला असून या व्यवस्थापकावर वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीरजकुमार असे या आरोपीचे नाव आहे. वांद्रे-कुर्ला संकुल येथे मुख्यालय असलेल्या बँकेची वडाळा येथे शाखा असून शाखेतील दैनंदिन कामकाजाचा अहवाल नियमित मुख्यालयाकडे पाठविण्यात येतो. या कार्यालयात सादर करण्यात आलेल्या अहवालाचे मूल्यमापन करण्यात येते. बँकेतील एका अधिकाऱ्याच्या खात्यामध्ये बरेच ओव्हरड्राफ्ट व्यवहार झाले असल्याचे निदर्शनास आले. याबाबत बिहारमधील पाटणा येथील ज्या बँक खात्यामध्ये पैसे पाठविण्यात आले त्या शाखेकडे मुख्यालयातून विचारणा करण्यात आली. वडाळा येथील वरिष्ठ व्यवस्थापक नीरजकुमार यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाल्याचे विभागीय चौकशीत समोर आल्यानंतर मुख्यालयातून याबाबतची माहिती देण्यात आली. वडाळा शाखेच्या वतीनेही खात्यांची तपासणी केली असता नीरजकुमार यांच्या खात्यामधून पैशाची देवाणघेवाण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर याबात नीरजकुमार यांच्याकडे विचारणा केली असता खात्यामधून आर्थिक देवाणघेवाण केल्याचे त्यांनी मान्य केले. बिहारमधील पाटणा येथे प्लॉट खरेदी केला असून त्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने ही अफरातफर केल्याचे ते म्हणाले. नीरजकुमार यांनी जवळपास ६३ लाख २४ हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे खात्यांची पडताळणी केल्यावर उघड झाल्याने बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांनी त्यांच्याविरोधात वडाळा पोलिस ठाण्यात तक्रार केली. अशी केली अफरातफर बँकेत खातेदारांची पैसे काढण्याची अथवा ट्रान्स्फर करण्याची मर्यादा टेम्पररी ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातून वाढविण्यात येते. एफडी सर्टिफिकेट, एलआयसी पॉलिसी किंवा अन्य गुंतवणुकीचे प्रमाणपत्र गहाण ठेवून काही मुदतीसाठी कर्जही घेता येते. खातेदारांना या सुविधा देण्याचा अधिकार बँकेच्या व्यवस्थापकाला असतो. याच अधिकाराचा गैरवापर करून नीरजकुमार यांनी चार ते पाच खातेदारांच्या खात्यांचा वापर करून स्वतःच्या आणि पत्नीच्या बँक खात्यावर पैसे पाठविले. पैसे पाठविल्यावर त्याने ही टेम्पररी ओव्हरड्राफ्ट खाती बंद केली. या खात्यांची निवड व्यवस्थापक असल्याने नीरजकुमार यांना सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत कोणताच आर्थिक व्यवहार न झालेली खाती माहीत होती. या खात्यांद्वारे पुन्हा व्यवहार सुरू करण्यासाठी केवायसी अपडेट करणे गरजेचे असते. त्यामुळे आरोपीने या खात्यांची निवड केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3oQzjiP

No comments:

Post a Comment