म. टा. खास प्रतिनिधी, भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर एका पोलिस कॉन्स्टेबलने दारूच्या नशेत दहा वर्षांच्या मुलीला स्पर्श करीत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे. महापालिकेच्या रुग्णालयात नर्स असलेल्या आईबरोबर जात असताना हे कृत्य घडले. सशस्त्र दलामध्ये कार्यरत असलेल्या या पोलिसाला भांडुप पोलिसांनी अटक केली असून त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले. कल्याणला राहणारा सशस्त्र पोलिस दलातील कॉन्स्टेबल रविवारी मित्रांना भेटण्यासाठी भांडुप येथे आला होते. तीन-चार मित्रांबरोबर बारमध्ये दारू प्यायल्यानंतर सर्वजण दुचाकीवरून फेरफटका मारण्यास निघाले. भांडुप स्थानकानजिक बाजारामध्ये नर्स आपल्या मुलीसोबत जात होती. याचवेळी दारूच्या नशेतील कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आला आणि मुलीच्या अंगाला स्पर्श केला. हे पाहून तिच्या आईने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक या ठिकाणी जमा झाले. नशेतील या तरुणांना धडा शिकविण्यासाठी नर्स आणि तिच्या मुलीने भांडुप पोलिस ठाण्यात धाव घेतली. भांडुप पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक केली. तपासामध्ये हा तरुण पोलिस असल्याचे समोर आले. याबाबतचा अहवाल पोलिसांनी सशस्त्र दलाकडे पाठविला. या पोलिस कॉन्स्टेबलला सेवेतून निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मुलीला छेडण्याच्या उद्देशाने स्पर्श केला नाही. लग्न होऊनही मूल नसल्याने व्यथित असून त्यामुळेच आपुलकीने हात लावल्याचे पोलिसाने चौकशीत म्हटले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/30GGyC0
No comments:
Post a Comment