नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रमचा विक्रम मागे टाकला आहे. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४१६ बळी घेतले आहेत. यासह अश्विनने अक्रमचा ४१४ बळींचा विक्रम मागे टाकला. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने १०४ कसोटी सामन्यात ४१४ विकेट घेतल्या आहेत. अश्विनने आपल्या कारकिर्दीतील ८० वा कसोटी सामना खेळताना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध काईल जेमिसनला बाद करून अक्रमला मागे सोडले. अश्विनने किवी संघाचा सलामीवीर विल यंग, जेमिसन आणि विल्यम समरविले यांना तंबूचा रस्ता दाखवला. क्रिकेटच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन आता १४ व्या क्रमांकावर आहे. भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने कसोटीमध्ये ६१९ बळी घेतले आहेत. या यादीत माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी कसोटीत ४३४ विकेट्स घेतल्या आहेत, तर खूप दिवसांपासून संघातून बाहेर राहिलेल्या हरभजन सिंगच्या नावावर ४१७ कसोटी बळी आहेत. हरभजनला मागे टाकण्यासाठी अश्विनला फक्त २ बळींची गरज आहे. तिसरा दिवस भारतीय गोलंदाजांचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलच्या पाच बळींच्या जोरावर भारताने शनिवारी (२७ नोव्हेंबर) कानपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडला पहिल्या डावात २९६ धावांत गुंडाळले. यासह भारताने ४९ धावांची आघाडी घेतली, पण भारताच्या दुसऱ्या डावाची सुरवात खराब झाली. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या सलामीवीर शुभमन गिलला यजमानांनी लवकर माघारी धाडले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताची धावसंख्या एक बाद १४ अशी होती. सध्या भारताकडे ६३ धावांची आघाडी आहे. काईल जेमिसननेच शुभमन गिलची विकेट घेतली. गिल फक्त १ धाव काढून बाद झाला. चेतेश्वर पुजारा (९) आणि मयंक अग्रवाल (४) धावा काढून नाबाद राहिले आहेत. तिसरा दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावावर राहिला. एकवेळ मजबूत स्थितीत दिसणारा न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या दिवशी पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. १ बाद १९६ अशी धावसंख्या असताना न्यूझीलंडने पुढील १०० धावात सर्व गडी गमावले. अक्षरने दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडला एकापाठोपाठ धक्के देण्यास सुरवात केली. अक्षरने ३४ षटकात ६२ धावा देत पाच बळी घेतले.. भारताचे सामन्यात पुनरागमन करण्याचे श्रेय उमेश यादवला द्यावे लागेल, कारण त्याने उपाहारापूर्वीच केन विल्यमसनला स्वस्तात बाद करून मोठा अडसर दूर केला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32FfVxO
No comments:
Post a Comment