मुंबई : तब्बल १८३०० कोटींचे विक्रमी भांडवल उभारताना किरकोळ तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांना जोरदार झटका देणाऱ्या वन ९७ कम्युनिकेशनच्या शेअरने भांडवली बाजारात जोरदार कमबॅक केला आहे. पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्सचा शेअर सलग तीन सत्रात २९ टक्क्यांनी वधारला. या अनपेक्षित तेजीने नोंदणीवेळी होरपळेल्या गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला. आज गुरुवारी मुंबई शेअर बंद होताना वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर २.४८ टक्क्यांनी वधारला आणि तो १७९६.५५ रुपयांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरमध्ये २.६४ टक्के वाढ झाली. तो ४६.३० रुपयांच्या तेजीसह १७९८.७५ रुपयांवर बंद झाला. यापूर्वी काल बुधवारी पेटीएमच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर कालच्या सत्रात १७.३ टक्क्यांनी वधारला होता आणि १७५३.२ रुपयांवर बंद झाला होता. त्याआधीच्या सत्रात मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड ९.९ टक्क्यांनी वधारून १४९५ रुपयांपर्यंत पोहोचला होता. पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने समभाग विक्रीतून १८३०० कोटीचे भांडवल उभारले होते. मात्र गुंतवणूकदारांसाठी पेटीएमची नोंदणी धक्कादायक ठरली. आतापर्यंतचा भांडवली बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरला मात्र निराशाजनक लिस्टींगमुळे तो तितकाच गाजला होता. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडची नोंदणी झाली. मात्र पहिल्याच दिवशी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर तब्बल २७.२ टक्क्यांनी कोसळला. आयपीओमध्ये शेअर प्राप्त झालेल्या गुंतवणूकदारांना प्रती शेअर ५८५.९ रुपयांचे नुकसान सोसावं लागले. सोमवारी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी जेव्हा बाजार सुरु झाला तेव्हा पेटीएमच्या शेअरवर विक्रीचा दबाव कायम होता. त्यात दिवसअखेर वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर १३ टक्क्यांच्या घसरणीसह १३६०.३ रुपयांपर्यंत खाली आला होता. आयपीओ योजनेत पेटीएमने शेअरची इश्यू प्राईस २१५० रुपये निश्चित केली होती. वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने पेटीएमचे अवाजवी मूल्य दाखवले. कंपनीवर ३००० कोटींचा तोटा आहे. त्यामुळे नजीकच्या काळात शेअर आणखी घसरेल असे अंदाज वर्तवण्यात आले. काही विश्लेषकांनी पेटीएमचे वास्तविक मूल्य ७०० ते ८०० रुपये आहे. शेअर १२०० रुपयांपर्यंत खाली घसरेल, असे अंदाज व्यक्त केले होते. मात्र मंगळवारी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरने यू-टर्न घेतला आणि तेजीची वाट धरली. सलग तीन सत्रात वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरने २९ टक्के भरपाई केली आहे. ज्यामुळे सूचीबद्ध होताना अपेक्षाभंग झालेल्या गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला आहे.पेटीएमच्या अवाजवी बाजार मूल्यावर प्रश्न निर्माण करणाऱ्या सल्लागारांसाठी ही तेजी अचंबित करणारी आहे. शेअरने कमबॅक केल्याने कंपनीच्या बाजार भांडवलाची देखील भरपाई झाली आहे. वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या शेअरची आतापर्यंतची कामगिरी
तारिख | बंद भाव | बदल (रुपयांत) | बदल (टक्क्यांमध्ये) |
२५ नोव्हेंबर २०२१ | १७९६.५५ | ४३.४० | २.४८ |
२४ नोव्हेंबर २०२१ | १७५३.२० | २५८.२० | १७.३ |
२३ नोव्हेंबर २०२१ | १४९५.०० | १३४.७० | ९.९० |
२२ नोव्हेंबर २०२१ | १३६०.३० | -२०३.९० | १३.०० |
१८ नोव्हेंबर २०२१ (नोंदणीचा दिवस) | १५६४.२० | -५८५.९० | २७.२० |
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/311pYwG
No comments:
Post a Comment