श्रीनगरः पाकिस्तानी सैन्य आणि पाकची गुप्तचर संस्था आयएसआयसह दहशतवादी संघटनांना मोठा झटका बसला आहे. भारतीय सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दहशतवादी संघटनांचा मोठा मार्गदर्शक हाजी आरिफचा खात्मा केला. तर ही बातमी देईपर्यंत त्याच्या दोन साथीदारांसह चकमक सुरू होती. हाजी आरिफ हा आधी पाकिस्तानच्या सैन्यात होता. पण दहशतवादी संघटनांशी असलेले त्यांचे संबंध पाहता पाकिस्तान प्रशासनाने त्याला सीमेजवळ जमीन दिली आणि त्याला पाकिस्तानच्या धारकुंडी खुरैता सेक्टरचा लाँच पॅड कमांडर बनवले. दहशतवाद्यांचा एक गट नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करणार असल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलांना मिळाली होती आणि या गटात तीन ते पाच दहशतवादी असू शकतात. या गटात लश्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवादी असू शकतात, अशीही माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी भिंबर गली आणि आसपासच्या भागाला वेढा घातला आणि आज घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवादी आणि सुरक्षा दलांच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले, अशी माहिती सुरक्षा एजन्सीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव हाजी आरिफ असे आहे. हाजी आरिफला लाँचिंग पॅडचा कमांडरही बनवण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून तो भारतीय हद्दीत दहशतवाद्यांची घुसखोरी करत होता, अशीही माहिती समोर आली आहे. या कामात पाकिस्तानी स्पेशल फोर्स आणि पाक रेंजर्सही त्याला साथ देत होते. आरिफ याआधी पाकिस्तानी सैन्यात होता. पण त्यादरम्यान त्याचे दहशतवादी संघटनांशी चांगले संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर त्याला पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयने धारकुंडी खुरैता सेक्टरमध्ये जमीन दिली होती आणि तिथून दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी करावी असे त्याला सांगण्यात होते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. हाजी आरिफला त्या भागातील सर्व खाचखळग्यांची सखोल माहिती होती. त्यामुळे प्रत्येक वेळी तो भारतीय लष्कराच्या हातातून निसटला. नौशेरा सेक्टरजवळ पाक सैन्याची घातक टीम बॅट अॅक्शनमध्येही तो मार्गदर्शक होता, असे सांगितले जात आहे. इतरांच्या मुलांची दिशाभूल करून त्यांना भारतात जिहाद करण्यासाठी पाठवणाऱ्या आरिफला दोन मुले आहेत. त्यापैकी एक दुबईत तर दुसरा सौदी अरेबियात राहतो. सध्या सुरक्षा दलांची चकमक सुरू असून त्यांना आणखी यश मिळू शकते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3CU7cnW
No comments:
Post a Comment