मुंबई : क्रिप्टो करन्सी व्यवहारांना कायदेशीर मान्यता नसली तरी देशात बेकायदा क्रिप्टो एक्सचेंज मोठ्या संख्येने सुरु आहेत. क्रिप्टो व्यवहारांच्या आडून होणाऱ्या कर चोरीचा मुंबई जीएसटी आयुक्तालयाने पर्दाफाश केला आहे. वझीरएक्स या क्रिप्टो एक्सचेंजवर जीएसटी आयुक्तालयाने कारवाई केली असून यात ४०.५ कोटींची कर चोरी उघडकीस आणली आहे. वझीर एक्स हे विनिमय केंद्र मेसर्स झानमाई लॅब्ज प्रा लि. कडून चालवले जाते तर डब्लूआरएक्स हे क्रिप्टोकरन्सी चलन मेसर्स बिनान्स इन्वेस्टमेंट कंपनी लिमिटेड या सेशेल्समधील कंपनीच्या मालकीचे आहे. झानमाई लॅब्जने डिसेंबर २०१७ मध्ये स्थानिक क्रिप्टोकरन्सी स्टार्टअप म्हणून वझीर एक्सची नोंदणी केली होती. वाचा : हे विनिमय केंद्र व्यापाऱ्याला रुपये किंवा डब्लूआरएक्समध्ये व्यवहार करण्याचा पर्याय उपलब्ध करून देते. वझीरएक्स प्लॅटफॉर्मकडून डब्लूआरएक्स खरेदी करावे लागते. या विनिमय केंद्राकडून ग्राहक आणि विक्रेता या दोघांकडूनही कमिशनची आकारणी केली जात होती आणि रुपयावरील व्यवहारावर ०.२ टक्के तर डब्लूआरएक्स वर ०.१ टक्के आकारणी होत होती. ट्रेडींग शुल्क, डिपॉझिट शुल्क आणि विथड्रावल शुल्क म्हणून ही कंपनी कमिशनमधून मोठ्या प्रमाणावर महसूल जमा करत होती असे चौकशीत आढळले. ही कंपनी रुपयावर मिळालेल्या कमिशनवर जीएसटी भरत होती मात्र डब्लूआरएक्स चलनावर मिळालेल्या कमिशनवर जीएसटी भरत नसल्याचे दिसून आले. या व्यवहारावरील शुल्क म्हणून १८ टक्के दराने जीएसटी लागू होतो. अशा प्रकारे सुमारे ४०.५ कोटी रुपयांचा जीएसटी भरला गेला नव्हता. हा कर आणि व्याज आणि दंडासह एकूण ४९.२ कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरुपात वझीरएक्सकडून जागीच वसूल करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. मुंबई झोन अंतर्गत येणाऱ्या सर्व क्रिप्टोकरन्सी विनिमय केंद्रांची तपासणी सीजीएसटी विभाग करणार असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे जीएसटी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pJcKhN
No comments:
Post a Comment