: पैशाचा पाऊस पडेल यासाठी जादूटोणा करुन एका तरुणाने मांत्रिकाची मदत घेत आपल्या मामीचा गळा आवळून खून केला. तसंच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात समोर आला आहे. चार दिवसानंतर पोलिसांच्या चौकशीत दोघांनी हत्येची कबुली दिल्यानतंर तापी नदीकाठी पुरलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. माया दिलीप फसरे (वय ५१, रा. क्रांती चौक, शिवाजीनगर) असं मृत महिलेचं नाव आहे. () मांत्रिक संतोष रामकृष्ण मुळीक (वय २२, रा. शिवाजीनगर) याने जादूटोणा करुन पैसे मिळवून देण्याचे आमिष भाचा अमोल रतनसिंग दांडगे (वय २७ रा. शिवाजी नगर ) याला दाखवले होते. त्यासाठी नदीकाठी पूजा-पाठ करावा लागेल, बळी द्यावा लागेल असं सांगितलं. त्यानुसार अमोल याने आपली मामी माया फरसे यांना विश्वासात घेतले. नदीकाठी पूजा करायची आहे असं खोटं बोलून त्याने १५ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मामीला सोबत घेऊन विदगाव गावाजवळील तापी नदीकाठ गाठला. मांत्रिक संतोषही होता सोबत संतोष आणि अमोल या दोघांनी काही वेळ पूजापाठ केला आणि त्यानंतर दोरीच्या साहाय्याने माया फरसे यांचा गळा आवळून खून केला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहरा जाळला. यांनतर मृतदेह तेथेच पुरून दोघे जळगावात निघून आले होते. मात्र माया फरसे या घरी परत न आल्याने त्यांचे पती दिलीप रुपचंद फरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. दिलीप फरसे यांनी भाचा अमोल याच्यावर संशय देखील व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी सोमवारी सकाळी अमोल व संतोष या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच दुपारी दोन वाजता त्यांनी गुन्ह्यााची कबुली दिली. जादूटोणा करण्यासाठी नदीकाठी गेल्यानंतर बळी देण्यासाठी मामीचा खून केल्याची माहिती अमोलने दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दोघांना सोबत घेत नदीकाठ गाठला. चौकशी करुन माया फरसे यांचा मृतदेह बाहेर काढला. ओळख पटवल्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला, तर अमोल व संतोष या दोघांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. दरम्यान, जादूटोण्याच्या कारणावरुन खून केल्याची माहिती अमोलने दिली आहे. परंतु, या गुन्ह्यात इतरही काही कारण असून शकते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी हळद, कुंकू असे पूजेचे साहित्यही आढळून आलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pdr8hR
No comments:
Post a Comment