गडचिरोली : जिल्ह्यात आरमोरी,गडचिरोली आणि अहेरी असे तीन विधानसभा क्षेत्र असून या ठिकाणी भाजपचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आमदार आहेत. मात्र,राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे गडचिरोली चे भूमिपुत्र आहेत तसेच नगर विकास मंत्री तथा शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत आणि या दोघांनीही गडचिरोली जिल्ह्यात जाहीर सभा घेतली.या निवडणुकीत भाजपचे वरिष्ठ नेते कुणीही प्रचारात उतरले नाही. त्यामुळे स्थानिक आजी-माजी आमदारांनीच प्रचाराचा धुरा सांभाळला आहे. महाविकास आघाडीत समाविष्ट राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी हे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी येथे जाहीर प्रचार सभा घेतली. एकंदरीत गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीत महा विकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच लढत दिसून येत असलेतरी काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांची चांगलीच टक्कर राहणार आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रावर भाजपचे आ. कृष्णा गजबे, गडचिरोली विधानसभा क्षेत्रावर आ. डॉ. देवराव होळी यांचे वर्चस्व आहे. तर,अहेरी विधानसभा क्षेत्रावर आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे वर्चस्व आहे.अशा परिस्थितीत शिवसेना काही ठिकाणी काँग्रेस आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करून लढत आहे. मुख्य म्हणजे नगरविकास विभागाचा खाता हे गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच असल्यामुळे शिवसेनेचे किती उमेदवार निवडून येतील याकडे संपूर्ण जिल्हा वासीयांचे लक्ष लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात 3 नगरपरिषद आणि 9 नगरपंचायती आहेत.आरमोरी विधानसभा क्षेत्रात आरमोरी आणि देसाईगंज या 2 नगरपरिषद आणि कोरची व कुरखेडा या 2 नगरपंचायती आहेत. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात गडचिरोली हे नगरपरिषद आहे आणि धानोरा व चामोर्शी हे 2 नगरपंचायती आहेत. तर,अहेरी विधानसभा क्षेत्रात मुलचेरा,एटापल्ली,भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाचही नगरपंचायती आहेत. जिल्ह्यातील 9 नगर पंचायतीमध्ये 142 जागांसाठी 554 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच अपक्ष असे सर्वच उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. अहेरी नगरपंचायतीकडे सर्वांचे लक्ष; काका पुतण्याची प्रतिष्ठा पणाला 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्याकडे आदिवासी विकास मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री पद होते. 2015 मध्ये त्यांच्याच कार्यकाळात तालुका मुख्यालयातील ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला होता आणि अहेरी नगरपंचायतीवर त्यांनी भाजपचा झेंडा फडकविला.मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना आपलेच काका व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम यांनी मात देऊन मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविले.सध्या गडचिरोली जिल्ह्यात महाविकास आघाडीचे एकमेव आमदार म्हणून धर्मराव बाबा आत्राम यांची ओळख असलेतरी अहेरीत काका-पुतण्या या दोघांचेही वर्चस्व आहे.त्यामुळे राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी नगरपंचायतीवर झेंडा कोण फडकविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3pmJHjX
No comments:
Post a Comment