नवी दिल्ली: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेली अखेरची वनडे मॅच ४ धावांनी गमावली. या पराभवासह भारताचा मालिकेत ३-० असा पराभव झाला. पहिल्या दोन लढती गमावल्याने भारतासाठी ही मालिका प्रतिष्ठेची होती. पण टीम इंडियाने ती गमावली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताला कसोटी मालिकेपाठोपाठ वनडे मालिकेत देखील पराभवाला सामोरे जावे लागले. वाचा- अखेरच्या वनडेत भारताने द.आफ्रिकेला २८७ धावात रोखले होते. क्वींटन डी कॉक मैदानावर असताना यजमान संघ ३००च्या पुढे धावसंख्या करेल असे वाटत होते. पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना रोखले. विजयासाठी २८८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताच्या डावाचा पाय शिखर धवन आणि विराट कोहली यांनी मजबूत केला. ही जोडी बाद झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. विजयासाठी ७८ धावांची गरज असताना भारताने ७ विकेट गमावल्या होत्या. पण दीपक चाहरने ३४ चेंडूत ५४ धावांची खेळी करून संघाला सामन्यात परत आणले होते. विजयासाठी १० धावांची गरज असताना तो बाद झाला आणि अखेरच्या दोघा फलंदाजांना फक्त पाच धावा करता आल्या नाहीत. वाचा- दिग्गजांना मागे टाकले भारताने पहिली वनडे ३१ धावांनी गमावली, दुसऱ्या वनडेत त्याचा ७ विकेटने पराभव झाला होता. तर अखेरची वनडे ४ धावांनी गमावली. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुलने केले. वनडेचा नियमीत कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाल्याने राहुलकडे नेतृत्व देण्यात आले होते. पण त्याला ही जबाबदारी पेलली नसल्याचे दिसते. राहुलकडे प्रथमच एखाद्या मालिकेत नेतृत्व देण्यात आले होते आणि या मालिकेतील ३ लढती भारताने गमावल्या. कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या ३ लढती गमावणारा तो भारताचा पहिला वनडे कर्णधार ठरलाय. वाचा- महत्त्वाची आकडेवारी >> दक्षिण आफ्रिकेचा भारताविरुद्ध हा सर्वात निसटता विजय ठरलाय. याआधी त्यांनी २०१५ साली कानपूर येथे ५ धावांनी विजय मिळवला होता. तर २००० साली नागपूर वनडेत १० धावांनी विजय मिळवला होता. वाचा- >> भारतीय संघाचा व्हाइटवॉश होण्याची ही पाचवी वेळ आहे. याआधी २०२० साली न्यूझीलंडने भारताचा ०-३ असा व्हाइटवॉश केला होता. >> वनडे इतिहासात दोन्ही संघांच्या सर्व विकेट म्हणजेच २० विकेट पडल्यानंतर सर्वाधिक धावा होण्याची ही तिसऱ्या क्रमांकाची मॅच ठरली आहे. या सामन्यात दोन्ही संघ ऑलआऊट झाले आणि ५७० धावा झाल्या. वनडेमध्ये संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकाची धावसंख्या आहे. याआधी २००१ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बेंगळूरू येथे झालेल्या सामन्यात देखील २० विकेट पडल्या होत्या आणि ५७० धावा झाल्या होत्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fRNikk
No comments:
Post a Comment