लातूर : उत्पादक शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांची होणारी आडवणूक आणि पिळवणूक थांबविण्यासाठी लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रात लातूर आणि रेणापूर या दोन तालुक्यात प्रतिदिन दोन हजार टन ऊस गाळप क्षमतेचे दोन प्रकल्प लवकरच उभारणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी सोमवारी केली. आ. कराड यांचा हा निर्णय कार्यकर्त्यांना बळ देणारा ठरला आहे. लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी आणि भाजपा कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील प्रणवश्री मंगल कार्यालयात झाली. या बैठकीत अनेक गावच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ऊसाच्या संदर्भात निर्माण होत असलेल्या अडी अडचणी आणि व्यथा मांडून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपल्या हक्काचा प्रकल्प उभा करावा, अशी आग्रही मागणी केली. मांजरा परिवारातील सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी, सभासद हे मालक असताना प्रस्थापितच मालक होवून बसले आहेत. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेण्याऐवजी त्यांनी अनेकांची अडवणूक करून पिळवणूक केली असल्याने अनेकजण अडचणीत सापडले. अशा ऊस उत्पादकांना न्याय मिळावा, कार्यकर्त्यांची मान ताठ रहावी यासाठी आणि अनेकांच्या आग्रहाखातर आपणही साखर उद्योगात उतरले पाहिजे, याचा विचार करुन त्यातील बारकाव्याचा अभ्यास करून लातूर आणि रेणापूर या दोन तालुक्यात स्वतंत्रपणे प्रतिदिन दोन हजार टन ऊसाचे गाळप करणारा प्रकल्प उभा करणार, असल्याचे यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड यांनी जाहिर केले. 'ज्यांनी मला रात्रंदिवस साथ दिली त्यांच्यासाठी काहीतर केले पाहिजे, मिळालेल्या आमदारकीतून गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या डोळयातील अश्रू पुसण्याचे काम करणार असल्याचे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, "कराड कुटूंब जे कार्य हाती घेतात ते कार्य निस्वार्थ भावनेने करतात. शिक्षण, आरोग्य आणि धार्मिक कार्यात ज्या पध्दतीने काम केले त्याच पध्दतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वांना विश्वासात घेवून भौगोलिक दृष्टया सोयीनुसार दोन्ही प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पातून साखर आणि गुळ पावडर या दोन्हीचे ५० टक्के उत्पादन असेल त्याचबरोबर सोयाबीनवर प्रक्रिया करणारा संलग्न प्रकल्प उभारला जाणार आहे". "सोबतच वीज निर्मिती करणार असून भविष्यात इथेनॉल निर्मिती करण्याचा मानस आहे. तसेच मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी शासनाच्या नियमानुसार एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी मांजराच्या गेट समोर आंदोलने केली. मात्र अद्यापही न्याय मिळालेला नाही. जोपर्यंत हक्काचा मोबदला मिळणार तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. एफआरपीसाठी न्यायालयात गेलो तर गाळप परवाना रद्द होवून कारखाने बंद होतील. म्हणून आज मी शांत आहे", असेही यावेळी आ. रमेशअप्पा कराड यांनी बोलून दाखविले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33rUUr5
No comments:
Post a Comment