मुंबई : शिक्षण घेऊन आयुष्यात काही तरी करून दाखवावं, अशी आस असलेल्या आणि मोठी स्वप्न पाहत असलेल्या दुर्गम भागातील शाळकरी मुलींच्या धैर्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी तोंडभर कौतुक केले. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील खिरखंडी या गावातील मुली लाकडाची होडी स्वत:च चालवून कोयना धरणाचा विशाल जलाशय पार करत दररोज शाळेत जातात, या ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’च्या वृत्ताची दखल घेत न्यायालयाने हा प्रश्न ‘सुओ मोटो’ जनहित याचिकेद्वारे विचारार्थ घेण्याचे निश्चित केले. () हा प्रश्न न्यायालयाने स्वयंप्रेरणेने दाखल करून घेतलेल्या (सुओ मोटो) जनहित याचिकेच्या स्वरुपात न्यायालयासमोर यावा यादृष्टीने हा मुख्य न्यायमूर्तींसमोर मांडावा, असे निर्देश न्या. प्रसन्ना वराळे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने रजिस्ट्रीला दिले. ‘शिक्षणासाठी या मुली दररोज घेत असलेल्या कष्टाचं करावं तेवढे कौतुक कमीच आहे. त्यांच्या धाडसाचे व धैर्याचे कौतुक करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नाहीत’, अशा आशयाचं निरीक्षण नोंदवतानाच ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ या सरकारी मोहिमेला खरं यश प्राप्त व्हायचं असल्यास सरकारने अशा मूलभूत प्रश्नांकडे वेळीच लक्ष देणं आवश्यक असल्याचं मतही खंडपीठाने नोंदवलं आहे. ‘आपला देश ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आजही काही भागांत मुलींना शिक्षणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. सातारा जिल्ह्यातील एका खेड्यातील मुलींना आजही जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागतं. हा राज्यातील एक प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी याच जिल्ह्यातील खिरखंडी गावातील चित्र वेगळं आहे. खिरखंडी हे गाव जावली तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पात येते. या दुर्गम भागातील शाळकरी मुलींना शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या गावातील मुली दररोज शाळेत जाण्यासाठी लाकडी होडीने प्रवास करतात आणि विशेष म्हणजे त्या स्वत:च होडी चालवून कोयना धरणाचा विशाल जलाशय पार करतात. शिवाय तिथून पुढे जाण्यासाठीही त्यांना सुमारे चार किलोमीटरचा परिसरही काट्याकुट्यांतून आणि किर्र जंगलातून पायपीट करत पार पाडावा लागतो. सुमारे दीड तासांच्या अशा खडतर प्रवासानंतर या मुली अंधारी या गावात पोहोचतात आणि तेव्हा कुठे त्यांच्या शिक्षणाला सुरुवात होते’, असं वृत्त मटा ऑनलाईनने दिलं होतं. या वृत्ताची खंडपीठाने स्वत:हून दखल घेतली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/VXHp1k6DO
No comments:
Post a Comment