पार्ल : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला पहिल्या वनडे सामन्यात पराबव पत्करावा लागला. हा सामना संपल्यावर राहुलने पराभवाचे कारण सांगितले. त्याचबरोबर माजी कर्णधार विराट कोहलीबाबत एक महत्वाचे विधानही केले आहे. राहुल सामन्यानंतर नेमकं काय म्हणाला, पाहा...पहिल्याच वनडे सामन्यात राहुलला पराभव पत्करावा लागला. या पराभवाची कारणं सांगताना राहुल म्हणाला की, " आम्ही सामन्याची चांगली सुरुवात केली होती. पण मधल्या षटकांमध्ये आम्हाला सामन्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. मला २० षटकांपर्यंत फलंदाजी करता आली नाही. कारण खेळपट्टीमध्ये बदल होणार होता. कोहलीने मला सांगितले होते की, एकदा का खेळपट्टीवर स्थिरस्थावर झाले की चांगल्या धावा निघू शकतात, पण माझ्याकडून ही गोष्ट घडली नाही. त्याचबरोबर मधल्याफळीत यावेळी चांगल्या भागीदाऱ्या पाहायला मिळाल्या नाहीत, त्यामुळेच आम्हाला पराभव पत्करावा लागला." दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करताना २९६ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली होती. शिखर धवन आणि विराट कोहली यांनी अर्धशतके झळकावली, पण मोक्याच्या क्षणी त्यांनी आपल्या विकेट्स गमावल्या. त्यानंतर भारतीय संघाची पडझड सुरु झाली आणि त्यांच्यावर ३१ धावांनी सामना गमावण्याची वेळ आली. त्यामुळे आता तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-० अशी आघाडी घेतली आहे. शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. पण स्थिरस्थावर झाल्यावर हे दोघेही बाद झाले आणि भारताचे कंबरडे मोडले गेले. धवनने यावेळी संघात पुनरागमन करताना १० चौकारांच्या जोरावर ७९ धावा केल्या, तर कोहलीने तीन चौकारांच्या जोरावर ५१ धावा फटकावल्या. हे दोघे बाद झाल्यावर श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यर यांना जास्त काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही आणि भारताच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. पण शार्दुल ठाकूरने अर्धशतक झळकावत यावेळी अखेरच्या षटकापर्यंत किल्ला लढवला, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3GLznYK
No comments:
Post a Comment