वृत्तसंस्था, किव्ह अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांना थेट धमकी देत युक्रेनमध्ये सैन्य घुसवलेल्या रशियाला कडव्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागत आहे. युक्रेनला नि:शस्त्र करण्याचे कारण देत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पुकारलेल्या या युद्धात आपल्या सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून युक्रेनी नागरिकही रस्त्यांवर उतरल्याने पाच दिवसांनंतरही रशियाला मोठा विजय मिळवता आलेला नाही. त्याचवेळी सोमवारी चर्चेच्या पहिल्या फेरीत युक्रेनने संपूर्ण शस्त्रसंधीची ठाम मागणी लावून धरली. दुसरीकडे अमेरिका व युरोपीय देशांनी सशस्त्र मदतीचा ओघ सुरू केल्याने युक्रेनचे मनोधैर्यही उंचावले आहे. बेलारूसमध्ये सोमवारी युक्रेन व रशियाने चर्चेस सुरुवात केली. या बैठकीला युक्रेनकडून संरक्षणमंत्री व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर रशियाकडून चर्चेसाठी पुतिन यांनी सांस्कृतिक विभागाच्या आपल्या सल्लागारांना धाडल्याने त्यातून काही निष्पन्न होण्याची शक्यता सुरुवातीलाच दुरावली. रशियाने आमच्या भूमीतून सैन्य माघारी न्यावे व संपूर्ण शस्त्रसंधी पुकारावी, अशी ठाम मागणी युक्रेनने लावून धरली. मात्र अपेक्षेप्रमाणेच रशियाकडून त्यास प्रतिसाद न मिळाल्याने या फेरीतून काहीच निष्पन्न होऊ शकले नाही. लवकरच दोन्ही देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार असल्याचे सांगण्यात आले. 'चर्चेचे समान मुद्दे अधोरेखित झाले असून, त्यावर सखोल चर्चा झाली. या मुद्द्यांवर दोन्ही देशांकडून सहमती घडेल', असे निवेदन रशियन सरकारच्या स्पुटनिक या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले. तर युक्रेनच्या अध्यक्षांच्या कार्यालयातील सल्लागारांनीही 'प्राथमिक प्राधान्यक्रमाचे विषय चर्चिले गेले असून, चर्चेच्या दुसऱ्या फेरीत अधिक ठोस सहमतीची आशा आहे', असे स्पष्ट केले. एकीकडे चर्चेची सुरुवात झाली असतानाच रशियाच्या फौजा अजूनही युक्रेनची शहरांभोवती वेढा टाकून आहेत. मात्र त्यांना युक्रेनच्या फौजांकडून कडवा प्रतिसाद मिळत असून, युक्रेनमधील मोठी शहरांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकलेला नाही. राजधानी किव्ह व खारकिव्ह या मोठ्या शहरांपासून लांबवरच रशियन फौजांना अडवून ठेवण्यात युक्रेनचे सैन्य यशस्वी झाले आहे. त्याचवेळी अमेरिका आणि युरोपीय देश युक्रेनला सशस्त्र मदत करण्यासाठी सरसावल्याने रशियासमोर आणखी कडवे आव्हान उभे राहणार आहे. दुसरीकडे राजनैतिक स्तरावर आणि आर्थिक आघाडीवर रशियाला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नांनीही वेग घेतला आहे. रशिय़न बँकांना स्विफ्ट सेवेपासून दूर ठेवल्याने रशियाचे चलन रुबल सोमवारी एका डॉलरच्या तुलनेत ८४वरून १०५ रुबलपर्यंत घसरले. रशियातील मॉस्कोसारख्या मोठ्या शहरांतील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी रांगा लागल्याचे दिसून आल्याने या युद्धाचे चटके रशियालाही जाणवू लागले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zFWcqjU
No comments:
Post a Comment