लातूर : लातूरमध्ये पोलिस आणि डॉक्टरमध्ये फ्री स्टाईल मारामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिवाजी चौकात वाहतूक पोलीस आणि डॉक्टर यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झालीय. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसात डॉक्टर आणि पोलिसांवर गुन्हा दाखल झालाय. शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या शिवाजी चौकात नेहमीच वाहनांची गर्दी असते. याच गर्दीत शहरातील कान, नाक, घासा तज्ञ डॉक्टर आनंत गोरे शहरातील शिवाजी चौकातून सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता जात असताना त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाले आणि त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. ही बाब त्या ठिकाणी कर्तव्यावर असणारे वाहतूक पोलीस अंमलदार दत्ता काळे यांच्या लक्षात आली. त्यांनी डॉक्टर गोरे यांची गाडी बाजूला घेण्यास सांगितले. डॉक्टर गोरे यांनी गाडी बाजूला घेतली. दरम्यान या दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. वाद वाढत गेला आणि प्रकरण हमरीतुमरीवर आलं. वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. भर चौकात पोलिस आणि डॉक्टर यांच्यातील फ्री स्टाईल हाणामारी अनेकांनी पाहिली. या घटनेनंतर पोलिस अंमलदार दत्ता काळे आणि डॉक्टर आनंत गोरे यांना वैद्यकीय तपासणीसाठी विलासराव देशमुख वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. पोलीस अंमलदार दत्ता काळे प्राथमिक उपचार घेऊन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आले तर डॉक्टर गोरे आनंत गोरे यांना तेथेच उपचारासाठी अॅडमिट करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी पोलिस अंमलदार दत्ता काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉक्टर आनंत गोरे यांच्यावर मोटार वाहन कायद्याच्या कलमानुसार शिवाजी नगर पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इतर समकक्ष डॉक्टरांच्या समोर डॉक्टर आनंत गोरे यांचा पोलिसांनी इन कॅमेरा जबाब नोंदवला. या जबाबानुसार त्यांना पाच जणांनी मारहाण केली. यात पोलिस अंमलदार दत्ता काळे, त्यांचे तीन सहकारी आणि एका महिलेचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा डॉक्टर संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. तसेच पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन देत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/d6f3n27
No comments:
Post a Comment