Breaking

Saturday, February 26, 2022

रोहितसेनेचा दुसरा मालिका विजय, श्रेयस अय्यरने अर्धशतकासह एकहाती सामना जिंकवला... https://ift.tt/JzIo04S

धरमशाला : श्रेयस अय्यरच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात श्रीलंकेवर दणदणीत विजय साकारला. भारताने हा दुसरा सामना जिंकत मालिकाही २-० अशी खिशात टाकली आहे. भारताचा हा सलग दुसरा मालिका विजय ठरला आहे. यापूर्वी भारताने वेस्ट इंडिजवर ट्वेन्टी-२० मालिकेत ३-० असा दमदार विजय साकारला होता. श्रेयसने यावेळी ४४ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ७४ धावा फटकावल्या आणि भारताने सात विकेट्स राखत विजय साकारला. रवींद्र जडेजाने अखेरच्या षटकांमध्ये जबरदस्त फटकेबाजी करत फक्त १८ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ४५ धावांची वादळी खेळी साकारली. श्रीलंकेने या सामन्यात भारतापुढे विजयासाठी १८४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. पहिल्याच षटकात भारताने रोहित शर्माची विकेट गमावली, त्याला एकच धाव करता आली. त्यानंतर भारताला दुसरा सलामीवीर इशान किशनही १६ धावांवर बाद झाला. भारताची २ बाद ४४ अशी स्थिती झाली होती. पण त्यानंतर श्रेयसने धडाकेबाज फटकेबाजी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. श्रेयसला यावेळी अखेरच्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाची चांगली साथ मिळाली. भारताला सुरुवातीच्या षटकांमध्ये यश मिळवता आले नाही. या गोष्टीचा चांगलाच फायदा श्रीलंकेच्या सलामीवीरांनी उचलला. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी संयत फलंदाजी करत अर्धशतकी सलामी दिली. पण त्यानंतर भारताचा हुकमी एक्का असलेल्या रवींद्र जडेजाने भारताला पहिले यश मिळवून दिले. जडेजाने यावेळी श्रीलंकेचा सलामीवीर दानुष्का गुणतिलकाला ३८ धावांवर बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. दानुष्का आणि पथुम निसांका यांनी ६७ धावांची सलामी दिली. ही जोडी फुटल्यावर मात्र श्रीलंकेला एकामागून एक धक्के बसत गेले. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने चरिथ असालंकाना पायचीत पकडले आणि श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. असालंकाला यावेळी दोन धावा करता आल्या. त्यानंतर भारताला तिसरा बळी मिळवून दिला तो वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने. श्रीलंकेच्या कामिल मिशाराला हर्षलने एका धावेवर बाद केले आणि संघाला तिसरे यश मिळवून दिले. यावेळी श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज दिनेश चंडिमल हा भारतासाठी मोठा अडसर ठरू शकला असता. पण भारताचा उपकर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने त्याला ९ धावांवर बाद केले आणि भारताला मोठे यश मिळवून दिले. एकामागून एक विकेट्स पडत असल्या तरी निसांका मात्र खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. निसांकाने यावेळी अर्धशतक झळकावले आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. यावेळी त्याला कर्णधार दासुन शनाकाची चांगली साथ मिळाली. अखेरच्या षटकांमध्ये मोठी फटकेबाजी करण्याचे आपले मनसुबे त्यांनी स्पष्ट केले होते. श्रीलंकेच्या पथुम निसांकाने ५३ चेंडूंत ७५ धावांची खेळी साकारली, त्यामुळेच श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IMPymAa

No comments:

Post a Comment