: विट्यातील शाहूनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेने तिच्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी उघडकीस आली. सोनाली बिहूदेव हात्तेकर (वय २६), आरोही बिहूदेव हात्तेकर (वय ४) या दोघींसह एक महिन्याच्या बाळाचा मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. () मिळालेल्या माहितीनुसार, विट्यातील शाहूनगर परिसरात बिहूदेव हात्तेकर हा शाळा नंबर ११ जवळ भाड्याच्या घरात राहतो. पत्नीसह मजुरीचे काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. बिहूदेवची पत्नी सोनाली ही सोमवारी सकाळी चार वर्षांची मुलगी आरोही आणि एक महिन्याच्या बाळाला घेऊन घराबाहेर पडली होती. पती बिहूदेव याने शहरात पत्नी आणि मुलांचा शोध घेतला. दुपारी दीडच्या सुमारास नेवरी रस्त्यावरील शिवाजीनगर येथे राजेंद्र शितोळे यांच्या शेतातील विहिरीत एका महिलेसह तिघांचे मृतदेह तरंगत असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह विटा ग्रामीण आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. मृतदेहाची ओळख पटताच पोलिसांनी बिहूदेव हात्तेकर याला बोलवून अधिक चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत विवाहितेच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. विटा पोलिसांकडून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी दिली. दरम्यान, विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्यामुळे विटा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/41e8vqL
No comments:
Post a Comment