: १५ वर्षापूर्वी एक कानाखाली लगावली म्हणून महाराष्ट्रात भाषेचा सर्व ठिकाणी समावेश करण्यात आला, असे सांगतानाच राज ठाकरे यांच्या पत्नी आणि मनसेच्या नेत्या यांनी मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांचं कौतुक केलं. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्याची काही लोकांना लाज वाटत होती, तर काहींना ती सक्ती वाटत होती. मात्र आज महाराष्ट्रात मराठी भाषेचा सर्व ठिकाणी उल्लेख केला जातो, ते फक्त मनसेमुळे शक्य झाले, असेही त्या म्हणाल्या. मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे गौरव महिलांचा या कार्यक्रमासाठी शर्मिला ठाकरे आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. मराठी भाषा सर्वांच्या बोलण्यात आणि ऐकण्यात यावी यासाठी मनसेकडून 'खळखट्याक' आंदोलने करण्यात आली. या प्रयत्नांमुळेच आज मराठी भाषेचा समावेश महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी करण्यात आला, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. दरम्यान जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी, आपण मराठीच बोलले पाहिजे, आपण मराठीमध्ये सवांद साधला तरच समोरची व्यक्ती मराठीत बोलू शकेल. त्यामुळे प्रत्येकाने आपले मराठीपण जपले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. जर पंधरा वर्षांपूर्वी कानाखाली लगावली नसती तर, आजही आपल्याला दुकानांवर हिंदी आणि इंग्रजीमध्येच पाट्या पाहायला मिळाल्या असत्या. १५ वर्षापूर्वी कानाखाली लगावल्यामुळेच हे शक्य झाले. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिलेला लढा याचे आज हे फळ असून, महाराष्ट्रात जर मराठी पाट्यांसाठी कोणाच्या काचा, दुकाने फोडावे लागत असतील तर ते लज्जास्पद असल्याची खंत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली. मराठी भाषा दिन म्हणून आजच्याच दिवशी नाही तर वर्षाचे ३६५ दिवस मराठीतच बोलले पाहिजे व यापुढे सर्व नागरिकांनी मराठीतच बोलावे असे आवाहनदेखील शर्मिला ठाकरे यांनी केले आहे. तर आरक्षणांबाबत बोलताना शर्मिला ठाकरे यांनी समाजात आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण दिले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. लतादीदींच्या स्मारकापेक्षा त्यांच्या स्मरणार्थ मोठे संगीत विद्यापीठ सुरू करावे, असे मतही यावेळी शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी शिक्षकांचा सत्कारही शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच मनसे मध्यवर्ती कार्यालय, विष्णूनगर येथे आयोजित केलेल्या "मराठी स्वाक्षरी " कार्यक्रमाला देखील त्यांनी हजेरी लावून स्वतः मराठीत स्वाक्षरी केली. यावेळी गडकरी रंगायतन येथील कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता, मनसे नेते अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, महिला अध्यक्ष समीक्षा मार्कंडे आदी उपस्थित होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QqRjpIG
No comments:
Post a Comment