Breaking

Saturday, March 19, 2022

धक्कादायक! मुंबईकरांना मिळतंय भेसळयुक्त दूध, पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून... https://ift.tt/LYtVHWa

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे नियंत्रण पथकाने वाकोला येथील एका चाळीमध्ये छापा टाकून दूधभेसळ उघडकीस आणली आहे. वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या पिशव्या फोडून त्यामध्ये अस्वच्छ पाणी भरून हे भेसळयुक्त दूध विकले जात होते. पोलिसांनी सुमारे साडेपाचशे लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा हस्तगत केला. एकाला अटक केली आहे. पहाटेच्या वेळी चाळीमधील खोलीत ही भेसळ केली जात होती. मुंबईत जवळील डेअऱ्यांमधून मध्यरात्रीनंतर दूध पोहोचण्यास सुरुवात होते. आधी मोठमोठ्या सेंटरवर दूध पोहोचले, की तेथून पहाटेपर्यंत छोट्या विक्रेत्यांना मिळते. वाकोला येथील एक दूधविक्रेता दूध विकण्यापूर्वी त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळून अर्धा लिटरचे एक लिटर करून विकत असल्याची माहिती गुन्हे नियंत्रण पथकाला मिळाली. या पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास सांताक्रूझ पूर्वेकडील लोखंडवाला चाळीमध्ये छापा टाकला. चाळीमधील ३२ क्रमांकाच्या खोलीमध्ये नागराज हा तरुण गोवर्धन गोल्ड दुधाच्या पिशव्या फोडून त्यामध्ये पिंपामध्ये भरलेले अस्वच्छ पाणी मिसळत असल्याचे दिसून आले. पहाटे चारच्या दरम्यान नागराज याचे कृत्य सुरू होते. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाचा पंचनामा करून साडेपाचशे लिटर भेसळयुक्त दूध हस्तगत केले. त्याचबरोबर दुधाच्या रिकाम्या पिशव्या तसेच भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. अनेक महिन्यांपासून नागराज भेसळ करून दुधाची विक्री करीत होता. त्याच्या विरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून गुन्हे नियंत्रण पथकाने त्याला त्यांच्या ताब्यात दिले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0XPaRtH

No comments:

Post a Comment