Breaking

Friday, March 25, 2022

संपकरी ST कर्मचाऱ्यांना सरकारनं दिली नवी तारीख; म्हणाले, नोकरी जाणार नाही! https://ift.tt/vf3T0na

मुंबई : एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं पुन्हा विनंती केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत कामावर रुजू व्हावे, कुणाचीही नोकरी जाणार नाही. कामावर रुजू झाल्यानंतर त्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने परिवहन मंत्री यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी कर्मचारी ठाम आहेत. मुंबईतील आझाद मैदानात कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनेही अहवाल दिला आहे. त्यात विलीनीकरण शक्य नसल्याचे नमूद केले आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या अहवालाला मान्यता दिली आहे. एसटी संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानपरिषदेत निवेदन केलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात गैरसमज पसरवले जात आहेत. कोणाचीही नोकरी जाणार नाही. संपकरी कर्मचाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कामावर रुजू व्हावे. त्यानंतर त्यांच्या इतर मागण्यांबाबत चर्चा करू, अशी ग्वाही परब यांनी सभागृहात दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात संपाबाबत सरकारची भूमिका मांडण्याची सूचना विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभा अध्यक्षांनी दिली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज, शुक्रवारी दोन्ही सभागृहांमध्ये याबाबत निवेदन केले. त्यावेळी त्यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू होण्याची विनंती केली. एसटी कर्मचाऱ्यांना इतिहासात कधी जी वाढ मिळाली नव्हती, ती त्यांना दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता १२ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढवून दिला. इतरही भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सेवा कालावधीनुसार, अनुक्रमे ५ हजार, ४ हजार, २ हजार ५०० रुपये अशी वाढ करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात जवळपास ७ ते ९ हजार रुपये वाढ झाली आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून, दिवाळी भेटही दिली. पगाराची हमी घेतली. १० तारखेच्या आत पगार होतील अशी ग्वाही दिली. कुणाला कामावरून काढण्याचा प्रश्नच नव्हता. जे-जे कर्मचाऱ्यांना देणे शक्य होते, त्यापेक्षा जास्त त्यांना एसटी महामंडळाने दिले, असे परब यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/E0uBhoD

No comments:

Post a Comment